पोलिस कर्मचाऱ्याचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; उरुळीकांचन येथील वाहतुक पोलिसाचा दुर्दैवी अंत…!


उरुळी कांचन : मुंबई-पुणे महामार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौकात चाकण फाट्यावर कर्तव्यावरील वाहतूक पोलीसाला ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून पोलीस नाकाबंदी सुरु असताना मंगळवारी (ता. 13) रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.

मिथून धेंडे (वय-39, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर अपघातानंतर ट्रकचालक चाकण एमआयडीसीतील वाहनतळावर ट्रक पार्किंग करुन फरार झाला.

14 मे रोजी धेंडे यांचा वाढदिवस होता. मात्र आदल्या दिवशी रात्रीच त्यांना मृत्यूने गाठले. याबद्दल पोलिस दलात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे ग्रामीणच्या पोलीस जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पोलीस उपअधीक्षक दिलीप शिंदे, वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार कदम, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, शीतलकुमार डोईजड, जिल्हा पोलिस ग्रामीण दलातील पोलीस कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते. यावेळी उरुळी कांचनचे सरपंच अमित (बाबा) कांचन, उरुळी कांचन परिसरातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, एक ट्रकचालक मुंबई -पुणे महामार्गावरून बेधडक गाडी चालवत असल्याबाबत एका दुचाकीस्वाराचा 112 आपत्कालीन क्रमांकावर फोन आला. त्यानुसार वडगाव मावळ पोलिसांकडून तत्काळ चाकण फाट्यावर नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी चालू होती. सदर एचआर-74 बी-3677 क्रमांकाचा ट्रक दृष्टीक्षेपात येताच वाहतूक नियंत्रण विभागाचे कर्तव्यावरील पोलीस अंमलदार मिथून धेंडे यांच्यासह वाहतूक सहायक सुतार यांनी तो ट्रक अडवून गाडीचे इंजिन बंद केले. मात्र, धेंडे यांनी बॅरिकेड लावण्याचा इशारा करताच ट्रकचालकाने अचानक ट्रक चालू करुन चाकण दिशेने वेगाने पळवला.

दरम्यान समोर उभे असलेले मिथून धेंडे यांना ट्रकने चिरडले. पोटावरुन ट्रकचे चाक गेल्याने गंभीर जखमी झालेल्या धेंडे यांना सोमाटणे येथील पवना हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र,उपचारापुर्वीच धेंडे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.पुणे ग्रामीण पोलिसांनी त्वरित चाकण बाजूला नाकाबंदी आदेश दिले.

मात्र, ट्रकचालक नाकाबंदी हुकवत चाकण एमआयडीसीतील एचपी चौकालगच्या वाहन तळावर ट्रक पार्क करुन फरार झाला. दरम्यान घटनेची माहीती समजताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळ आणि पवना हॉस्पीटल येथे भेट देऊन माहिती घेतली.

रात्री दोन वाजता धेंडे यांचा मृतदेह तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मुळच्या उरुळी कांचन येथील असलेल्या मयत मिथून धेंडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार असून धेंडे हे वडगाव मावळ पोलीस ठाण्यात मनमिळाऊ कर्मचारी म्हणून सर्वश्रुत होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!