पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, दबावामुळे गुन्हाही दाखल नाही, आयुक्त अमितेश कुमार यांना गोष्ट समजली अन् यंत्रणाच हलली, पोलिसांना खडसावून आरोपीही पकडले…

पुणे : पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी राजकीय दबावामुळे चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी फिर्यादीलाच तडजोड करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, बंदोबस्तावरुन रात्री उशिरा परत आलेल्या व रस्त्यात गोंधळ घालणार्या तरुणांना हटकल्याने चौघांनी पोलीस हवालदाराला बेदम मारहाण केली. असे असताना वर्दीवर हात टाकणार्यांना दणका देण्याऐवजी पोलीस त्यांनाच पाठीशी घालत असल्याचे दिसून आले. अखेर हे प्रकरण पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर गेले.
त्यांनी खरडपट्टी काढल्यानंतर तीन दिवसांनी गुन्हा दाखल करुन चतु:श्रृंगी पोलिसांनी चौघांना अटक केली. चंद्रकांत जाधव हे रात्री १ वाजता बंदोबस्तावरुन कारने घरी आले. त्यावेळी तेथे रुपये मांजरेकर, अनिकेत राजेश चव्हाण, अनिकेत घोडके, अभि डोंगरे हे गोंधळ घालत बसले होते. त्यावेळी एवढ्या रात्री का गोंधळ घालत आहात, म्हणून जाब विचारला. तेव्हा अनिकेत घोडके व अभि डोंगरे हे पाठीमागून आले व त्यांनी जाधव यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रुपेश मांजरेकर हा समोरुन आला. त्याने बुक्क्यांनी मारहाण केली.
जाधव यांना मारण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी दोन तीन वेळा डोक्यावरील वार चुकविले. नंतर सर्व जण दुचाकीवरुन पळून गेले. उपचार घेऊन ते दुपारी १२ वाजता चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. परंतु, पोलिसांनी त्यांची सुरुवातीला दखलच घेतली नाही. त्यांना बराच वेळ बसवून ठेवले. ही गोष्ट पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यापर्यंत पोहचली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
याबाबत पोलीस हवालदार चंद्रकांत विष्णु जाधव (वय ४२, रा. रामोशीवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रुपेश मांजरेकर (वय २५), अनिकेत राजेश चव्हाण (वय २१), अनिकेत घोडके (वय २४ ), अभि डोंगरे (वय २४, सर्व रा. रामोशीवाडी, वडारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना बोलावून घेतले. त्यांची खरडपट्टी काढल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मग पोलिसांनी हालचाल करुन चौघांना अटक केली. न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना अधिक तपासासाठी २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. या प्रकरणाची मात्र पुण्यात चर्चा सुरू आहे.