PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्याच्या दौऱ्यावर! मुंबईतील कामांचे करणार भूमिपूजन…
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई आणि पालघरमध्ये नरेंद्र मोदींचे दोन कार्यक्रम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भुमिपूजन होणार आहे.
आज पालघरमध्ये वाढवण बंदराचे भूमिपूजन करणार आहेत. सुमारे ७६ हजार कोटी रुपयांचा वाढवण बंदर प्रकल्प आहे. समुद्रात खोल पाण्यातील बंदरांपैकी वाढवण हे भारतातील सर्वात मोठं बंदर असणार आहे. यामुळे भारताचा सागरी संपर्क वाढणार असून, जागतिक व्यापार केंद्र म्हणून भारताची भूमिका अधिक सक्षम होणार आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. PM Modi
वाढवण बंदर प्रकल्प भूमिपूजनासोबतच मोदी १,५६० कोटी रुपयांच्या २१८ मत्स्य प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करणार आहेत. तसेच ते मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ ला संबोधित करतील. एकात्मिक ॲक्वापार्क, रिसर्क्युलेटरी ॲक्वाकल्चर सिस्टीम आणि बायोफ्लॉक यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.
हे प्रकल्प देशातील विविध राज्यांमध्ये राबवण्यात येणार असून याद्वारे मत्स्यउत्पादन वाढवणे, मासेमारी-पश्चात व्यवस्थापन सुधारणे तसेच या क्षेत्रात सहभागी असलेल्या लाखो लोकांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण करणे यासाठी पायाभूत सुविधा तसेच उच्च दर्जाची सामग्री पुरवली जाईल. मासेमारी बंदरांसह, मत्स्य साठवणूक केंद्रे, अद्ययावतीकरण, मासळी बाजार आदी महत्त्वाच्या मत्स्यव्यवसायसंबंधी पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात येईल.