व्हिलन ठरवून माझ्या हत्येचा कट!! राजस्थानमधून मारेकरी आले होते, आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ..

बीड : भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी भयंकर आरोप केले आहेत. खोक्या भोसले प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यासाठ राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोकं मुंबईत आणली गेली.
धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं असं त्या लोकांना सांगितलं, बिश्नोई समाजामध्ये मला व्हिलन ठरवायचं होतं असा गंभीर आरोप धस यांनी केला. खोक्या भोसलेचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. खोक्या भोसलेने हरणांची शिकारसुद्धा केल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. त्या माध्यमातून खोक्या भोसले हा सुरेश धस यांना हरणांचं मांस पुरवत होता, असे आरोपही काही लोकांनी केले होते.
यामुळे प्रकरण गाजले होते. यावर आता धस यांनी एका मुलाखतीत हा आरोप केला आहे. बिश्नोई गँगला मुंबईत आणलं गेलं आणि माझ्या खुनाचा डाव, कट रचण्याचा प्रयत्न झाला असा धक्कादायक खुलासा धस यांनी केला. खोक्या उर्फ सतीश भोसले याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती, त्याच्यावर अनेक आरोप झाले होते, त्याच्यावर शिकारीचा देखील आरोप लावण्यात आला होता.
या कटामध्ये आणखी कोणी सामील आहे का, सुरेश धसांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या जीवाला धोका आहे, तर त्यासंदर्भात त्यांनी गृहविभागाला काही पत्र लिहीलं आहे का तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी या संदर्भात काही बातचीत केली आहे का ? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती पुढे आली नाही.
दरम्यान, खोक्या भोसले हा बराच काळ फरारही होता. नंतर त्याला अटकही झाली, त्याचं घरही पाडण्यात आलं होतं. त्याच्या घरात वन्यप्राण्याचं वाळलेलं मांस सापडल्याचा मुद्दाही समोर आला होता. तो आमदार धस यांच्या जवळचा असल्याचे सांगितले गेले, यामुळे प्रकरण तापले होते.