फोन आला अन् होत्याच नव्हतं झालं, मोबाईलवर बोलत उभे होते, तेवढ्यात संकट आलं, मुख्याध्यापकाचा मृत्यू..

नांदेड : नांदेड शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून सायंकाळच्या सुमारास वादळी वारे, वीजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. असे असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलवर बोलत असताना अंगावर वीज पडल्याने शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैव घटना घडली आहे.

यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. माहूर तालुक्यात गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. संजय कृष्णकुमार पांडे (वय ५६) (रा. करंजी ता. माहूर) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. विदर्भातील हिवरा संगम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संजय पांडे हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. करंजी (ता. माहूर) या मुळगावी मोटारसायकलवर परत जात होते.
गुरुवारी माहूरमध्ये अवकाळी पाऊस बरसला. संजय पांडे हे दुपारी साडे तीन वाजताच्या माहुरमध्ये दुचाकीवरून गावाकडे जात होते. यावेळी फोन आल्याने ते रस्त्यातच फोनवर बोलत थांबले होते. यावेळी अचानक अंगावर वीज पडली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने माहूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

माहूर शहरापासून २ किमी अंतरावर मालवाडा घाटात ते गाडी थांबवून फोनवर बोलत होते. यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि नियतीने डाव साधला. तसेच असोली येथे शेतात भुईमूगाच्या शेंगा गोळा करीत असतांना शेतमजूर अमरसिंग चव्हाण (रा. असोली ता. माहूर) यांच्या अंगावर वीज कोसळली त्यात ते गंभीर जखमी झाले.
दोघांनाही माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी पांडे यांना मृत घोषित केले. जखमी शेतमजूर अमरसिंग चव्हाण यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक उपचार करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरिक्षक शिवप्रकाश मुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक ती कार्यवाही केली. यामुळे पावसामध्ये बाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे.