कुंजीरवाडी येथील पेट्रोल पंपावरील दरोड्याच्या तयारीतील टोळी आळंदी म्हातोबाची येथे जेरबंद ; लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी …!


उरुळी कांचन : कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चार लोणी काळभोर पोलिसांनी आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथून ताब्यात घेतले आहे. सोमवारी (ता. २३) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रेम राजु लोंढे (वय- १९, रा. रेल्वे गेट जवळ, आळंदी रोड, मुळ रा. जामखेड, अहमदनगर), ऋषिकेश उत्तम लोंढे (२६, रा. पानमळा राड, मुळ रा. बाबळगाव, जि. बीड), गणेश भगवान खलसे (वय-२२ रा. माळवाडी कुंजीरवाडी, ता. हवेली), तानाजी भाऊसाहेब गावडे (वय-२३ रा. माळवाडी, कुंजीरवाडी , ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तर त्यांचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार आडके व भगत यांना माहिती मिळाली की, ७ ते ८ जण म्हातोबाची आळंदी रेल्वे ब्रिजच्या जवळ थांबले असून ते येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडवत आहेत अशी माहिती मिळाली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून पळून जात असताना चार आरोपींना पकडण्यात आले. तर त्यांचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता कुंजीरवाडी येथील अॅटोकॉर्नर एच.पी. पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी जात असल्याची कबुली दिली. आरोपींकडून २ लोखंडी पालघन, मिरची पुड, बॅटरी, नायलॉन दोरी, एक घट्ट चिकटपट्टी असा मुद्देमाल जप्त केला आहे.