Paralympics : आटपाडीच्या सचिन खिलारीची गगन भरारी! इतिहास रचत १९८४ नंतर भारताला गोळाफेकमध्ये पदक..


Paralympics : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये मराठमोळ्या सचिन खिल्लारे याने इतिहास रचला आहे. सचिनने पुरुषांच्या शॉटपुट F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सचिन खिलारीने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक पटकावले.

त्‍याच्‍या या कामगिरीमुळे भारताने ४० वर्षांनंतर पॅरालिम्पिकमध्‍ये गोळाफेक क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे. यापूर्वी १९८४ मध्ये भारताने या क्रीडा प्रकारात पदक जिंकले होते. सचिनच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताच्या पदकांची संख्या २१ झाली आहे.

सचिनचे सुवर्णपदक अवघ्या ०.०६ मीटरने हुकले…

सचिन खिलारीने आज१६.३२ मीटर्सच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले. सचिनचे सुवर्णपदक अवघ्या ०.०६ मीटरने हुकले. कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने 16.38 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक तर कांस्यपदक क्रोएशियाच्या लुका बाकोविच याने मिळवले. या स्पर्धेत भारताचा मोहम्मद यासर आठव्या तर रोहित कुमार नवव्या स्थानी राहिला.

गोळाफेक अंतिम फेरीत सचिनचा पहिला प्रयत्न 14.72 मीटर, दुसरा 16.32 मीटर, तिसरा 16.15 मीटर, चौथा 16.31 मीटर, पाचवा प्रयत्न 16.03 मीटर आणि सहावा (शेवटचा) प्रयत्न 15.95 मीटर होता. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे हे 21 वे पदक ठरले आहे.

सचिनने 2023 वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F46 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच 2024 च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदकावर मोहोर उमटवले होते.

दरम्यान, पॅरालिम्पिकच्या इतिहासात गोळाफेकीत पदक जिंकणारा सचिन खिलारी हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी १९८४ मध्ये जोगिंदर सिंग बेदीने कांस्यपदक जिंकले होते आणि दीपा मलिकने २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. आता हे तिसरे पदक ८ वर्षांनंतर आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!