ZP Bharti 2026 : जिल्हा परिषदेत तब्बल २,१३२ पदे रिक्त; आरोग्य विभागात ४०% जागा रिकाम्या, भरतीची तयारी अंतिम टप्प्यात


मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आणि सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता असून तब्बल २,१३२ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण, बांधकाम, कृषी आणि प्रशासनाशी संबंधित अनेक सेवांवर परिणाम होत असल्याने राज्य सरकारकडून जिल्हा परिषद भरतीची प्रक्रिया गतीने राबविण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

उपलब्ध आकडेवारीनुसार, जिल्हा परिषदांच्या विविध विभागांमध्ये एकूण ११,८०९ मंजूर पदांपैकी ९,६७७ पदे भरलेली असून २,१३२ पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग ३ मधील १,८८१ तर वर्ग ४ मधील २५१ पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आरोग्य विभागातच १,५२५ मंजूर पदांपैकी ७१२ पदे रिक्त असून ही संख्या जवळपास ४० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे.

शिक्षण विभागातही परिस्थिती चिंताजनक आहे. या विभागातील ५,१३० मंजूर पदांपैकी ३२६ पदे रिक्त असून पदोन्नतीच्या ९१ जागा अद्याप भरल्या गेलेल्या नाहीत. बांधकाम विभागात सरळ सेवेच्या ४१ आणि पदोन्नतीच्या ४२, पशुसंवर्धन विभागात ३५ पदांपैकी २३, तर कृषी विभागातही अनेक पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. महिला व बालकल्याण विभागातही काही पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) आणि इतर स्पर्धा परीक्षेद्वारे भरल्या जाणाऱ्या अनेक पदांची भरती २०२३ पासून रखडल्याचा आरोप कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे. या पदांची भरती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.

भरती प्रक्रियेदरम्यान काही पदांच्या शैक्षणिक पात्रतेतही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. विस्तार अधिकारी (कृषी) पदासाठी अर्ज करण्यास पात्र अभ्यासक्रमांची संख्या वाढविण्यात आली आहे. तारतंत्री पदासाठी आयटीआयधारक उमेदवारांना अर्ज करता यावा यासाठी ऑनलाइन प्रणालीत सुधारणा करण्यात आली आहे. कनिष्ठ सहाय्यक पदासाठी काही विशेष प्रवर्गातील उमेदवारांना मराठी टंकलेखन प्रमाणपत्राशिवाय अर्ज करण्याची मुभा देण्यात आली असून, कंत्राटी ग्रामसेवक आणि पशुधन पर्यवेक्षक पदांसाठी संगणक पात्रतेचे निकषही शिथिल करण्यात आले आहेत.

ग्रामीण विकास विभागाने भरतीसाठीचा अभ्यासक्रम आणि २७ संवर्गांची शैक्षणिक पात्रता निश्चित केली असून, अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, भरतीची अधिकृत जाहिरात, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि परीक्षा वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेची प्रतीक्षा करत आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता आणि नव्या अभ्यासक्रमानुसार तयारी सुरू ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!