भीमा पाटस कारखान्याला साखर आयुक्तांचा मोठा दणका! व्याजासहित उसाची थकीत रक्कम देण्याचे आदेश…

दौंड : दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना अर्थात निराणी ग्रुपने भाडेतत्त्वावर चालू केलेल्या श्री. साईप्रिया साखर कारखान्याने सन २०२२ – २३ च्या हंगामा मधील गाळप केलेल्या उसाची थकीत रक्कम १५% च्या व्याजासहित उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश राज्य साखर आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नुकतेच दिले आहेत.
तसेच ऊस (नियंत्रण) आदेश, १९६६ चे कलम ३ (३) मधील तरतुदीनुसार हंगामामध्ये गाळप केलेल्या ऊसाचे १४ दिवसात किमान एफआरपी (FRP ) प्रमाणे ऊस किंमत ऊस पुरवठादारांना अदा करणे प्रत्येक कारखान्यांना बंधनकारक आहे. विहित कालावधीत एफआरपी ची देयके अदा न केल्यास कलम ३(३) अनुसार विलंब कालावधी करीता १५% व्याज आकारण्याची तरतूद आहे.
असे असताना ही दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखाना निराणी ग्रुपने भाडेतत्त्वावर चालू केला, या श्री. साईप्रिया साखर कारखान्याने सुरू केलेल्या पहिल्याच गळीत हंगामामधील म्हणजेच सन २०२२-२३ मधील गळीत हंगामामध्ये एफआरपी प्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली गेली नाही.
त्यामुळे राज्य साखर आयुक्तांनी या कारखान्यास जप्तीची नोटीस बजावत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी ची थकीत रक्कम १५ टक्के व्याजसह जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
सांख्यिकी शाखेकडील यांच्या पाक्षिक अहवालानुसार, कारखान्याने आजपर्यंत रू. ५.७८ कोटी एफआरपी रक्कम अदा केलेली नाही.
आरआरसी आदेश निर्गमित करण्यापूर्वी कारखान्यास म्हणणे सादर करण्याची संधी देऊनही साखर कारखान्याने एफ आर पी (FRP) ची रक्कम थकीत ठेवून ऊस (नियंत्रण) १९६६ मधील तरतूदीचे उल्लंघन केले आहे. असा आरोप साखर आयुक्तांनी आदेशामध्ये केला आहे.