लग्नपत्रिका उघडणं पडलं महागात! पुण्यात तिघांना लाखोंचा गंडा, थेट पोलिसांत धाव; नेमकं काय घडलं?

पुणे : तुमच्या मोबाईलवर किंवा व्हॉट्सॲपवर एखाद्या मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून लग्नाची डिजिटल पत्रिका आली असेल, तर ती उघडण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण लग्नाच्या निमंत्रणाच्या नावाखाली सायबर गुन्हेगार नागरिकांना लक्ष्य करत असून पुण्यात अशाच प्रकारे तिघांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत.

सायबर भामटे व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिकेची लिंक किंवा APK फाईल पाठवतात. संबंधित व्यक्तीने त्यावर क्लिक करताच मोबाईलवरील नियंत्रण हॅकर्सच्या हाती जाते. त्यानंतर बँक खात्यांमधून पैसे परस्पर वळवले जातात.
बंडगार्डन परिसरातील ५६ वर्षीय व्यावसायिकाला अनोळखी क्रमांकावरून विवाह निमंत्रणाची लिंक पाठवण्यात आली होती. त्यांनी ती उघडल्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून तब्बल ५.३० लाख रुपये गायब झाल्याचे समोर आले. याप्रकरणी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश पेठेतील ४७ वर्षीय हार्डवेअर व्यावसायिकालाही मित्राच्या मोबाईलवरून आलेली लग्नपत्रिकेची फाईल मिळाली होती. संशय न आल्याने त्यांनी ती उघडण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच त्यांचा मोबाईल हॅक झाला आणि खात्यातून साडेपाच लाख रुपये काढण्यात आले. बँकेच्या मदतीने काही रक्कम परत मिळाली असली तरी त्यांचे लाखोंचे नुकसान झाले.

याचप्रमाणे गुरुवार पेठेतील ५४ वर्षीय स्टॅम्प विक्रेत्यालाही नातेवाईकाच्या मोबाईलवरून आलेल्या लग्नपत्रिकेच्या फाईलमुळे मोठा फटका बसला. फाईलवर क्लिक केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांच्या खात्यातून ४.१० लाख रुपये लंपास करण्यात आले.
सायबर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. मित्र किंवा नातेवाईकांच्या मोबाईलवरून आलेली लिंक असली तरी तिची खात्री केल्याशिवाय उघडू नये. विशेषतः APK फाईल्स डाउनलोड करणे टाळावे. फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन १९३० किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.