पुण्यात घर हवंय? म्हाडाच्या हजारो घरांसाठी अर्ज करण्याची मुदत संपणार; आजच करा अर्ज

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाच्या ४ हजार ४६२ सदनिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. अर्ज करण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असून, इच्छुक नागरिकांना ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

म्हाडाच्या या घरांसाठी नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. उपलब्ध माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल २ लाख ३८ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १ लाख ६५ हजार अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. त्यामुळे घरांसाठी इच्छुक असलेल्या नागरिकांमध्ये लॉटरीबाबत उत्सुकता वाढली आहे.
४,४६२ घरांसाठी विक्रमी अर्ज


पुणे म्हाडा मंडळाकडून २६ ऑगस्टपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ४ हजार ४६२ सदनिकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, विविध कागदपत्रांची पूर्तता आणि पडताळणी करताना अर्जदारांना अडचणी येत असल्याने मुदत वाढवण्यात आली.
यानंतर म्हाडाने अर्ज करण्याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. पुढे तिसऱ्यांदा मुदतवाढ देत अंतिम तारीख ३० ऑक्टोबर निश्चित करण्यात आली. आता ही मुदत संपण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत.
मुदतवाढ देण्यामागे काय कारण?
अनेक अर्जदारांना अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) आणि आयकर विवरणपत्राशी संबंधित (ITR) कागदपत्रे उपलब्ध करून घेण्यासाठी वेळ लागत होता. त्याचबरोबर कागदपत्रांची पडताळणी आणि ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करण्याच्या प्रक्रियेतही अडचणी येत होत्या.
महाआयटीच्या संगणक प्रणालीच्या अद्ययावतीकरणामुळे काही प्रमाणपत्रांची पडताळणी आणि अपलोड करण्यास विलंब झाला. त्यामुळे अर्जदारांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी म्हाडाकडून मुदत वाढवण्यात आली होती.
अर्जासाठी किती अनामत रक्कम भरावी लागते?
म्हाडाच्या सदनिकेसाठी अर्ज करताना प्रत्येक अर्जामागे २० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागत असल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय अर्ज शुल्क आणि त्यावरील जीएसटी लागू होतो. त्यामुळे अर्जदारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित योजनेतील शुल्क आणि नियम तपासणे आवश्यक आहे.
अर्जदारांची संख्या अडीच लाखांपर्यंत जाण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या १० हजारांहून अधिक अर्जांची पडताळणी बाकी आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत जवळ आल्याने शेवटच्या दिवसांत अर्जदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकूण अर्जसंख्या सुमारे अडीच लाखांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे.
त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे, अनामत रक्कम आणि अर्जाची स्थिती अधिकृत म्हाडा पोर्टलवर तपासून घ्यावी.
