एका लाखापेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात!! सर्वेत धक्कादायक माहिती आली समोर…

मुंबई : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत खळबळजनक माहिती समोर आली आहे. मराठवाडा विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आठही जिल्ह्यात एक सर्व्हे केला होता.

या सर्वेक्षणात एकूण १० लाख शेतकरी कुटुंबाची माहिती भरुन घेण्यात आली होती. एका लाखापेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी पाच लाख कुटुंबाचे १२टप्प्यात आणि १०० प्रश्न तयार करुन हा सर्व्हे करण्यात आला. सर्वेक्षण करताना प्रश्नांचे एकूण बारा विभाग करण्यात आले. यात एकूण १०४ प्रश्नांची माहिती अधिकाऱ्यांमार्फत भरुन घेण्यात आली.

यात आत्महत्या करण्याच्या विचारत असलेल्या शेतकऱ्यांची वेगळी यादी तयार करण्यात आली. तर एकूण १० लाख शेतकरी कुटुंबांपैकी १ लाख ५ हजार ७५४ शेतकरी कुटुंब अति संवेदनशील यादीत म्हणजेच आत्महत्या करण्याच्या विचारत असल्याचे समोर आले आहेत. तर २ लाख ९८ हजार ५१ शेतकरी कुटुंब संवेदनशील आढळून आली आहे.
तसेच सर्वेक्षण करुन ऑनलाईन माहिती भरण्यात आलेल्या एकूण १० लाख शेतकरी कुटुंबांच्या माहितीचे विश्लेषण करुन ७५ पेक्षा जास्त गुणांक असलेल्या शेतकरी कुटुंबांचा समावेश अति संवेदनशील कुटुंबांमध्ये तर ५० पेक्षा जास्त गुणांक असलेल्या कुटुंबांचा समावेश संवेदनशील कुटुंबांमध्ये करण्यात आला.
१३० प्रश्नांचा सर्वेक्षण नमुना…
प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणा दरम्यान शेती विषयक संबंधित व्यक्तीशी तसेच मानसोपचार तज्ञांशी चर्चेअंती सर्वसमावेशक असा एकूण १३० प्रश्नांचा सर्वेक्षण नमुना तयार करण्यात आला होता. तसेच जिल्हाधिकारी, क्षेत्रीय अधिकारी आणि शेतकरी यांच्याशी चर्चा करुन सर्वेक्षण नमुन्यातील प्रश्नांच्या गांभिर्यानुसार प्रश्नांना गुणांक देण्यात आले.
ही आहेत करणे
केंद्रेकर यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार औरंगाबाद विभागात सन २०१२ ते २०२२ या कालावधीत एकूण ८ हजार ७१९ शेतकरी आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी ९२३ नापिकीमुळे, १ हजार ४९४ कर्जबाजारीपणामुळे, ४ हजार ३७१ नापिकी व कर्जबाजारीपणा या दोन्ही एकत्रित कारणामुळे तर २ कर्ज परतफेडीच्या तगाद्यामुळे आणि १ हजार ९२९ इतर कारणांमुळे शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
सद्यस्थितीत शासनाने शेतकरी आत्महत्या प्रकरणी अनुदान देताना केलेल्या निकषात कर्जबाजारीपणा, नापिकी व कर्जपरतफेडीचा तगादा हे तीन निकष निश्चित केले आहेत.
मात्र, या तीन कारणांव्यतिरिक्त इतर कारणे देखील शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांना पेरणीसाठी १० हजार रुपये देण्याची मागणी केली आहे. मराठवाड्यातील १ लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहेत.
मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून ५०० रुपये महिना दिला जात आहे. दरम्यान शेतकरी आत्महत्याबाबत माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अहवालाबाबत कृषीमंत्री यांनी छाननी करावी, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.