एका निर्णयाने गिरीश महाजनांची बाजू भक्कम; विरोधकाची दोन्ही दारे बंद, पण महायुतीतच बंडाची ठिणगी! जळगाव जिल्हा बँकेत नेमकं काय शिजतंय?

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत मोठी घडामोड घडली आहे. जामनेर तालुका विकास सोसायटी मतदारसंघातून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवू पाहणारे रघुनाथ सखाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाला. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी पाटील यांनी नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांकडे धाव घेतली; मात्र तिथेही त्यांना यश आले नाही. त्यामुळे महाजन यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता वाढली आहे. तरी पाटील यांना न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे अंतिम चित्र न्यायालयीन निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.
२१ जागांसाठी निवडणूक; तीन जागा आधीच बिनविरोध


जिल्हा बँकेच्या एकूण २१ जागांसाठी २९ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. मतदानापूर्वीच तीन जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महायुतीच्या सर्व जागा जिंकण्याचा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला असला, तरी मित्रपक्षांमधील जागावाटपाचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही.

९० टक्के जागांवर एकमत, उरलेल्या जागांनी वाढवली डोकेदुखी

गिरीश महाजन, संजय सावकारे, गुलाबराव पाटील आणि महायुतीतील प्रमुख आमदारांच्या दोन बैठका पार पडल्या. सुमारे ९० टक्के जागांवर सहमती झाल्याचे महाजन यांनी सांगितले. मात्र मुक्ताईनगर, पाचोरा-भडगाव आणि चोपडा येथील उमेदवारीवरून अद्याप पेच कायम आहे.
मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंसमोर स्वकीयांच्याच आघाडीतील आव्हान
मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे समर्थक विनोद तराळ आणि देवयानी देशमुख यांनी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही बाजू माघार घेण्यास तयार नसल्याने महायुतीतच मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाचोरा आणि चोपड्यातही माघार घेण्यास नकार
पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांच्या विरोधात भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे काका सतीश शिंदे मैदानात आहेत. त्यामुळे येथेही युतीतील नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. चोपड्यात भाजपचे रोहित निकम आणि अजित पवार गटाचे घनशाम अग्रवाल यांच्यात उमेदवारीवरून संघर्ष आहे.
एका बाजूला महाजन यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता बळावत असताना दुसरीकडे महायुतीतील तीन महत्त्वाच्या ठिकाणांचा तिढा कायम आहे. त्यामुळे २९ नोव्हेंबरपूर्वी कोण माघार घेणार आणि कोणत्या मतदारसंघात मित्रपक्ष आमनेसामने येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
