हद्यद्रावक घटना ! झोपडीला आग लागून वृध्द पती-पत्नी जळून खाक ; सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घटना…!
बार्शी : पहाटे पाणी तापवण्यासाठी चूल पेटविली होती. वाऱ्यामुळे चुलीची ठिणगी खोपटीला लागून झोपडीने पेट घेतला. या आगीत दोन वृद्ध पती – पत्नी जागीच मयत झाल्याची घटना आज बार्शी तालुक्यातील गाडेगाव शिवारात घडली आहे
भीमराव काशीराम पवार (वय ९५) आणि कमल भीमराव पवार (वय ९०, दोघेही राहणार गाडेगाव, ता. बार्शी) अशी जागीच मृत्यू झालेल्या वृध्द दाम्पत्याची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, बार्शी तालुक्यातील गाडेगाव येथील वृद्ध महिला कमल भीमराव पवार (वय ९०) यांनी सकाळी उठून पाणी तापवण्यासाठी चूल पेटविली. त्यांच्या जवळील नातू प्रथमेश यास म्हैस सुटल्यामुळे बांधण्यासाठी उठवले. म्हैस बांधत असताना खोपटास आग लागली. ही आग विझविण्याचा दोघांनी खूप प्रयत्न केला. पत्नी कमलबाई यांनी आपला पती झोपडीत आत झोपलेला असल्यामुळे त्यांना उठवण्यासाठी आत गेल्या असता ते दोघेही आतमध्ये अडकले. दोघानाही आगीने वेढल्याने बाहेर पडता आले नाही. चारी बाजूंनी आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्या दोन्ही वृध्द दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरख भोसले, सर्जेराव गायकवाड, राजेंद्र मंगरूळ, आप्पासाहेब लोहार, महेश डोंगरे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेत वृध्द दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.