पुण्यात ओबीसींचा ‘पॉवर शो’! पोलिसांनी रोखलं, हाके संतापले; “अटक करा, लाठीचार्ज करा… तरी मुंबई गाठणार”

पुणे : महाराष्ट्रातील आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण चौथ्या दिवशीही सुरू असताना, आता ओबीसी आंदोलकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी आंदोलक पुण्यात दाखल झाले असून, मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
पुण्यात पोहोचलेल्या ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी अडवलं. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारला थेट इशारा दिला. “आम्हाला अटक करा, आमच्यावर लाठीचार्ज करा, जेलमध्ये टाका; तरी आम्ही १००१ टक्के मुंबईच्या दिशेने निघालो आहोत,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.

“आमचं आरक्षण टिकवत नाही”


सरकार ओबीसींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप हाके यांनी केला. “सरकार आम्हाला मोजत नाही, आमचं आरक्षण टिकवत नाही आणि आमचं म्हणणं ऐकायला तयार नाही. आमचं आरक्षण संपवलं, तसं आमचं आंदोलन संपवण्याचं काम सुरू आहे,” असं ते म्हणाले. ही आपल्या हक्क आणि अधिकारांची लढाई असून सरकारने ऐकून न घेतल्यामुळे ओबीसींना रस्त्यावर उतरावं लागल्याचंही त्यांनी सांगितलं.
आपली माणसं मोठ्या संख्येने आल्यानंतर मुंबईच्या दिशेने पुढे जाणार असल्याचं हाके यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पुण्यात रोखण्यात आलेला मोर्चा पुढे कधी आणि कोणत्या पद्धतीने मुंबईकडे रवाना होणार, याकडे लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्र्यांवर हाकेंचा निशाणा
लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारचे प्रतिनिधी वारंवार संपर्क साधत असल्याचा दावा त्यांनी केला. संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे यांना २५० वेळा फोन केल्याचं जरांगे यांनी सांगितल्याचा उल्लेखही हाके यांनी केला. ओबीसींच्या प्रश्नांकडे मात्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
हाके यांनी यावेळी संजय शिरसाट यांच्यावरही कठोर शब्दांत टीका केली. त्यांच्या वक्तव्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
ओबीसी आंदोलनातच मतभेद उघड
दरम्यान, लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला ओबीसी समाजातील सर्व संघटनांचा पाठिंबा असल्याचं चित्र नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायडे यांनी हाके यांच्या आजच्या मोर्चापासून अंतर राखलं आहे. लक्ष्मण हाके यांच्या मोर्चाच्या मागण्या स्पष्ट नसल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघ या आंदोलनात सहभागी होणार नाही, असं तायडे यांनी स्पष्ट केलं.
एकीकडे अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, तर दुसरीकडे पुण्यात ओबीसी आंदोलकांचा मोर्चा रोखण्यात आला आहे. हाके यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्धार कायम ठेवला असून, सरकारविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.