शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दिवसा वीज मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी केली मोठी घोषणा..

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिवसा सतत आणि अखंड वीजपुरवठा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, त्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला असून, या योजनेंतर्गत राज्यभरात १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
या प्रकल्पांचा थेट फायदा जवळपास ३ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून, त्यांना आता शेतीसाठी दिवसा सतत वीज उपलब्ध होणार आहे. सरकारने पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ, हरित आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.
सौरऊर्जेचा वापर वाढविल्यामुळे कार्बन उत्सर्जनात घट होऊन पर्यावरणपूरक विकास शक्य होणार आहे. हे प्रकल्प वितरण उपकेंद्राच्या 5 ते 10 किमी परिसरात उभारले जातील आणि त्यांची क्षमता 0.5 ते 25 मेगावॅट इतकी असेल.
त्यामुळे स्थानिक पातळीवरही ऊर्जानिर्मिती होईल आणि वीजवाहिन्यांवरील दाब कमी होईल. विशेष म्हणजे या सौर प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी एक धोरणात्मक संयुक्त समिती तयार करण्यात येणार असून, सेंट्रल डॅशबोर्ड द्वारे प्रत्येक टप्प्याचे म्हणजेच जमीन संपादन, उभारणी, यंत्रणा स्थापनेसारख्या कामांचे दररोज निरीक्षण करण्यात येईल.