आता गॅस सिलिंडरही काही मिनिटांत घरपोच! Swiggy Instamart ची मोठी घोषणा; HPCL सोबत भागीदारी, ‘HP Navya’ LPG सिलिंडर थेट ॲपवर उपलब्ध
बंगळुरू : किराणा आणि घरगुती वस्तू काही मिनिटांत घरपोच पोहोचवणाऱ्या क्विक कॉमर्स क्षेत्राने आता आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. Swiggy Instamart ने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सोबत भागीदारी करत ग्राहकांसाठी थेट ॲपवरून एलपीजी (LPG) सिलिंडर ऑर्डर करण्याची सुविधा सुरू केली आहे. क्विक कॉमर्स क्षेत्रात अशा प्रकारची सेवा सुरू करणारा हा देशातील पहिलाच प्लॅटफॉर्म ठरला असून, सध्या या सुविधेची सुरुवात प्रायोगिक तत्त्वावर बंगळुरूतील सुब्रमण्यपुरा परिसरातून करण्यात आली आहे.

या उपक्रमाअंतर्गत ग्राहकांना HPCL चा नव्याने सादर करण्यात आलेला १० किलोचा ‘HP Navya’ कॉम्पोझिट एलपीजी सिलिंडर तसेच ५ किलोचा मेटल एलपीजी सिलिंडर थेट Instamart ॲपवरून मागवता येणार आहे. विशेष म्हणजे, ही सुविधा वापरण्यासाठी ग्राहकांकडे आधीपासून घरगुती एलपीजी कनेक्शन असणे बंधनकारक नाही.
पहिल्यांदा सिलिंडर मागवणाऱ्या ग्राहकांना ओळखपत्र पडताळणीसह आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतरच्या सर्व ऑर्डर्स नियमित रिफिल म्हणून स्वीकारल्या जातील आणि नवीन सिलिंडर देताना रिकामा सिलिंडर परत घेतला जाईल.

‘HP Navya’ हा कॉम्पोझिट सिलिंडर पारंपरिक लोखंडी सिलिंडरपेक्षा वजनाने हलका असून त्याला गंज लागत नाही. अर्धपारदर्शक रचनेमुळे सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे बाहेरूनच सहज पाहता येते. त्यामुळे विद्यार्थी, भाड्याच्या घरात राहणारे नागरिक, नोकरदार, छोटे कुटुंब तसेच तात्पुरत्या निवासासाठी हा पर्याय अधिक उपयुक्त मानला जात आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीनेही कंपनीने विशेष काळजी घेतली आहे. Instamart वरून बुक करण्यात आलेले सर्व सिलिंडर HPCL च्या अधिकृत वितरकांकडूनच पाठवले जाणार असून, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत सर्व सरकारी नियम आणि सुरक्षा मानकांचे पालन करून घरपोच वितरण केले जाईल.
Instamart चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितेश झा यांनी सांगितले की, कंपनी आता केवळ किराणा वितरणापुरती मर्यादित राहिली नसून ग्राहकांच्या दैनंदिन गरजांशी जोडली जात आहे. तर HPCL चे संचालक (मार्केटिंग) अमित गर्ग यांनी या भागीदारीमुळे ‘HP Navya’ अधिकाधिक ग्राहकांपर्यंत वेगाने पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.
सध्या ही सेवा केवळ बंगळुरूमध्ये प्रायोगिक स्वरूपात सुरू असून, इतर शहरांमध्ये विस्ताराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, देशभरातील १३१ हून अधिक शहरांमध्ये कार्यरत असलेल्या Instamart च्या या नव्या उपक्रमाकडे क्विक कॉमर्स क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे.