तिसरं महायुद्ध कधीही पेटू शकतं!! नितीन गडकरींच्या इशाऱ्याने सर्वत्र खळबळ…

नवी दिल्ली : सुसंवाद, प्रेम आणि शांततेच्या अभावामुळे जग विनाशाच्या दिशेने वाटचाल करत असून, कधीही तिसऱ्या महायुद्धाची शक्यता आहे, असा गंभीर इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हा इशारा दिला आहे.
नितीन गडकरी यांनी जागतिक परिस्थितीवर भाष्य करत दिलेला महायुद्धाचा इशारा चर्चेचा विषय ठरला आहे. ६ जुलै रोजी ‘बियॉन्ड बॉर्डर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात गडकरी बोलत होते.
त्यांनी यावेळी सांगितले की, जगात महासत्तांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे सामाजिक समन्वय संपत चालला असून, संघर्षाचं वातावरण अधिकच गडद होत आहे. भारताला या पार्श्वभूमीवर शांतीदूताची भूमिका पार पाडावी लागेल, असंही ते म्हणाले आहे.
गडकरी म्हणाले की, आजच्या युद्धाचं स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी मानवी वस्त्यांवर हल्ले केले जात आहेत. यामुळे टँक, लढाऊ विमानं यांचं महत्त्व कमी झालं असून, युद्ध अधिक प्रगत आणि विध्वंसक झालं आहे. अशा परिस्थितीत मानवतेचे रक्षण करणे अधिक अवघड बनले आहे.
ते पुढे म्हणाले की, आपण हळूहळू विनाशाच्या दिशेने जात आहोत. महासत्तांच्या निरंकुशतेमुळे संवाद संपतोय. जगभर यावर चर्चा व्हायला हवी आणि वेळेत पावलं उचलली गेली पाहिजेत. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
गडकरींनी केवळ जागतिक नव्हे तर भारतातील आर्थिक विषमतेबद्दलही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, देशात गरीबांची संख्या वेगाने वाढतेय, तर संपत्ती मोजक्या लोकांच्या हातात केंद्रित होत आहे. हे चित्र धोकादायक असून, समृद्धीचं विकेंद्रीकरण होणं आवश्यक आहे.