नितीन गडकरी यांच्याकडून पालखी महामार्गाची पाहणी, रखडलेल्या कामांना मिळणार गती, नागरिकांकडून अनेक तक्रारी…


फलटण : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर पालखी मार्ग निरिक्षण केले. नागरिकांच्या अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांनी पाहणी केली. उद्या देखील ते तुकाराम महाराज पालखी महामार्गाची पाहणी करणार आहेत. आज ते म्हणाले,लाखो वारकऱ्यांची ‘वारी’ सुखकर व आल्हाददायक व्हावी, या उद्देशाने पुनर्विकास करण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-९६५) कामाचे आज निरिक्षण केले.

भारत भूमीच्या सनातन परंपरेत वारकरी संप्रदायाची पदयात्रा म्हणजेच ‘वारी’ ही श्रद्धा, तपस्या आणि समर्पणाचे जिवंत प्रतीक आहे. दर वर्षी आषाढी एकादशीच्या पर्वावर लाखो वारकरी पालखी समवेत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. मात्र अनेक वर्षे ही वारी वाहन संस्था, अरूंद रस्ते, वाढती वाहतूक आणि विशेषत: दिवे घाटाचा अरूंद, कठीण व धोकादायक टप्पा यांसारख्या विविध आव्हानांना, अडचणींना सामोरे जात होती.

या समस्यांवर उपाय म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५ जी) या मार्गांचा व्यापक पुनर्विकास करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला, जो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे लाखो वारकऱ्यांची वारी आता सुखकर व आल्हाददायक होणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) हा आळंदी ते पंढरपूर आणि पुढे मोहोळ ते वाखरी असा सुमारे २३४ किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे, जो पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडतो. ७,६२५ कोटी रुपयांच्या तरतुदीसह विकसित करण्यात येत असलेल्या या मार्गाचे बांधकाम मोहोळ ते वाखरी, वाखरी ते खुडूस, खुडूस ते धर्मपूरी, धर्मपूरी ते लोणंद, लोणंद ते दिवे घाट आणि दिवे घाट ते हडपसर अशा ६ पॅकेज मध्ये करण्यात येत आहे.

यापैकी ४ पॅकेजचे काम पूर्ण झाले असून धर्मपूरी ते लोणंद काम अंतिम टप्प्यात आहे, तर दिवे घाट ते हडपसर या पॅकेजचे ६५% काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग सासवड, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि पंढरपूर यांसारख्या भागांना बायपास करत जलद आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करतो. या मार्गावर वारकऱ्यांसाठी स्वतंत्र पदयात्रा मार्ग उभारण्यात आला असून, यामुळे वारकऱ्यांची वारी आता अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित झाली आहे.

विशेषत: दिवे घाट विभाग-२ वरून ४-लेनमध्ये रूंद आणि मजबूत करण्यात येत असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि प्रवास अधिक सुखकर होईल. यासोबतच उड्डाणपूल, रेल्वे ओव्हरब्रिज, अंडरपास आणि आधुनिक पुलांच्या माध्यमातून हा मार्ग अधिक सक्षम करण्यात आला आहे. पालखी मार्गावर रस्ते बांधकामादरम्यान येणारी झाडे ट्रान्सप्लांट करून त्यांना नवजीवन देण्यात आले आहे, तसेच रस्त्यांच्या दुतर्फा देशी व सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सासवड, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, पंढरपूर याठिकाणी बाह्यवळण रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या हेतूने माळशिरस येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी निर्माण केलेली ऐतिहासिक विहीर, वेळापूर येथील पुरातन लेणी व वाखरी जवळील बाजीराव विहीर या ऐतिहासिक स्थळांचे जतन करून प्रगती व संस्कृतीची सांगड घालण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!