महामार्गाचे भूसंपादन होण्याआधीच राष्ट्रीय महामार्ग घोषित ! वडगाव -वडकी -लोणीकंद मार्गासाठी काढणार अतिक्रमणे …!
पुणे : पुणे शहराच्या दृष्टीने महत्वाचा असणारा राष्ट्रीय महामार्ग ५४६ (डीडी) हा वडगाव, कात्रज, कोंढवा, उंड्री, वडकी-लोणी काळभोर, थेऊर फाटा-केसनंद ते लोणीकंद असा राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून याबाबत मागणी केली जात होती.
सध्या या रस्त्याच्या भूसंपादनाची कार्यवाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केली आहे. प्राधिकरणाकडून तसा पत्रव्यवहार पीएमआरडीए आणि महापालिकेस केला आहे. पुण्यातील वडगाव, कात्रज, कोंढवा, उंड्री, वडकी-लोणी काळभोर, थेऊर फाटा-केसनंद ते लोणीकंद अशा राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केंद्र सरकारने २०१८ मध्ये केली असली तरी अस्तित्वातील बहुतांश रस्ता हा राज्यमार्ग आहे.
याबाबत नवले पूल ते कात्रज चौक या रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासह वडगाव, कात्रज, कोंढवा, उंड्री, वडकी-लोणी काळभोर, थेऊर फाटा-केसनंद ते लोणीकंद असा राष्ट्रीय महामार्ग घोषित केला आहे. महापालिका हद्दीत उंड्री गावाचा नव्याने समावेश झाला आहे. या उंड्री गावातील रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा आहे.
या रस्त्यास आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने या रस्त्यालगतची बांधकामे पाडावी लागण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाकडून ११ गावांचा तर ‘पीएमआरडीए’कडून तयार करण्यात येणाऱ्या महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकास आराखड्याचा समावेश आहे.