पुण्यातील MPSC आंदोलनाला नवं वळण! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल; रोहित पवारांचा संताप, म्हणाले…


पुणे : पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या आंदोलनप्रकरणी १५ विद्यार्थ्यांवर पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आंदोलनाचे मुख्य आयोजक प्रमोद पाटील आणि अक्षय कांबळे यांच्यासह १५ जणांचा समावेश आहे. या कारवाईवर आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एस. एम. जोशी मार्गावर एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. १ ऑक्टोबर रोजी बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आंदोलनाचा नववा दिवस सुरू असतानाच पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

‘विद्यार्थ्यांच्या मागे वकिलांची फौज उभी करू’; रोहित पवारांचा इशारा

विद्यार्थ्यांवरील कारवाईवर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असून, त्यांच्या मदतीसाठी वकिलांची फौज उभी करू, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे जामीनपात्र असल्याचे सांगत रोहित पवार यांनी ही कारवाई अन्यायकारक असल्याची भूमिका मांडली. पोलिसांवर दबाव असल्यामुळे विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. “हे विद्यार्थी नक्षलवादी आहेत का?” असा सवाल उपस्थित करत न्यायालयात विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एमपीएससीच्या शुद्धीकरणासाठी गंगाआरती करणार

एमपीएससीमधील कारभारात सुधारणा व्हावी आणि संस्थेचे शुद्धीकरण व्हावे, यासाठी आज सायंकाळी गंगाआरती करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. पुणे महापालिकेने नदी किती स्वच्छ केली आहे, हेही यानिमित्ताने समोर येईल, असे ते म्हणाले. कोणतीही नदी असली तरी ती आपल्यासाठी पवित्र असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी दिल्लीतील आंदोलनासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. सरकारने दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे बंद केल्याचा आरोप करत, दिल्लीला जाण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

एमपीएससी आंदोलनाचा नववा दिवस; तीन उपोषणकर्त्यांनी सोडले उपोषण

दरम्यान, पुण्यातील एमपीएससी आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. आंदोलनादरम्यान अन्नत्याग उपोषणाला बसलेल्या सात उपोषणकर्त्यांपैकी तीन जणांनी उपोषण सोडल्याचे समोर आले होते. तरीही आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची गर्दी कायम असल्याचे चित्र आहे.

मध्यरात्रीही आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. काही आंदोलक रस्त्यावर झोपलेले दिसून आले. विद्यार्थ्यांवरील गुन्हे दाखल झाल्यानंतर आता या आंदोलनाबाबत पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!