IPS अंजना कृष्णा प्रकरणाला नवं वळण ; जिल्हा प्रशासनाच्या ‘या’ निर्णयाने अजित पवारांना धक्का..


सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात कुर्डू गावात झालेल्या अवैध मुरूम उपसा प्रकरणात आता नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा प्रशासनाने कुर्डूतील मुरूम उपसा बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले असून, आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य असल्याचे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

माढा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये अवैधरीत्या मुरूम उपसा सुरू होता. याची माहिती मिळाल्यानंतर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा कारवाई करण्यासाठी घटनास्थळी गेल्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माढा तालुका युवक अध्यक्ष बाबाराजे जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला आणि तो फोन अंजना कृष्णा यांच्या हातात दिला. या फोन कॉलमध्ये अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले, असे म्हटले जाते. हे संपूर्ण संभाषण कॅमेऱ्यात कैद झाले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.

याप्रकरणी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी कुर्डूतील मुरूम उपसा बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे अंजना कृष्णा आणि महसूल प्रशासनाने केलेली कारवाई योग्य असल्याचे सिद्ध झाले. यामुळे अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच सरपंच -ग्रामसेवक यांच्या विरोधात मुरूम चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!