‘ओबीसी सर्टिफिकेट’वरून पवारांच्या घरातच नवा वाद? वडेट्टीवारांच्या दाव्याने खळबळ; सुप्रिया सुळेंचा थेट पलटवार!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून नवा वाद पेटला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला. याच वक्तव्यादरम्यान त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनीही ओबीसी प्रमाणपत्र काढून ठेवल्याचं म्हटलं. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
वडेट्टीवारांच्या आरोपावर सुप्रिया सुळे यांनी तातडीने प्रतिक्रिया देत दावा फेटाळला. आपल्याकडे जन्म प्रमाणपत्र, पदवीचं प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र आणि बारामतीच्या खासदारपदाचं प्रमाणपत्र आहे; मात्र ओबीसी प्रमाणपत्र अजिबात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसकडून आपल्याला वारंवार लक्ष्य का केलं जातंय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

वडेट्टीवार यांनी पुढे सर्वच मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला. मात्र शरद पवारांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे की नाही, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने केवळ सुळेच नव्हे, तर मराठा नेतृत्व आणि ओबीसी आरक्षणाच्या राजकारणावरही नवा प्रश्न निर्माण झाला आहे.


दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून उपोषणाची घोषणा केली आहे. कुणबी नोंदी सापडल्यानंतरही प्रमाणपत्र मिळत नसल्याचा तसेच काही प्रमाणपत्रे जात वैधता समितीकडून अवैध ठरवल्याचा मुद्दा त्यांनी मांडला आहे. गरज पडल्यास पुन्हा मुंबईच्या दिशेने मोर्चा वळवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील आंदोलनांवरही निर्बंध घालण्यात आले असून, आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा मोर्चा काढण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयावर जरांगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
त्यामुळे ओबीसी प्रमाणपत्रावरून वडेट्टीवारांचा दावा, सुप्रिया सुळेंचा स्पष्ट इन्कार आणि जरांगेंच्या आंदोलनाची घोषणा यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता या आरोपांवर पुढील राजकीय प्रतिक्रिया काय येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.