पुण्याखाली लपलेलं नवं शहर? 34 हजार कोटींचे भुयारी बोगदे, वाहतूक कोंडी संपणार की नवा गोंधळ उभा राहणार?


पुणे : पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. ऑफिसला जाणे, शाळा-महाविद्यालये, रुग्णालये गाठणे या सगळ्या प्रवासात नागरिक तासन्‌तास अडकून पडत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा आणि महत्त्वाकांक्षी निर्णय घेत शहरात भुयारी मार्गांचे जाळे उभारण्याची योजना आखली आहे.

या प्रकल्पांतर्गत शहरात एकूण पाच मोठे भुयारी मार्ग (टनल्स) विकसित केले जाणार असून त्यांची लांबी सुमारे 54 किलोमीटर असेल. हे मार्ग उत्तर-दक्षिण दिशेने शहरातील प्रमुख भागांना जोडणार आहेत. यामध्ये कात्रज, येरवडा, खडीमशीन, स्वारगेट, रेसकोर्स, जगताप डेअरी, सिंहगड रोड, पाषाण, कोथरूड, औंध, संगमवाडी आणि खडकी यांसारख्या महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे.

महापालिकेच्या प्राथमिक आराखड्यानुसार हा प्रकल्प सुमारे 34 हजार कोटी रुपयांचा असून यासाठी स्वतंत्र विशेष उद्देश वहन यंत्रणा (SPV) स्थापन केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल देत स्वतंत्र कंपनीमार्फत अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून महापालिकेच्या अर्थसंकल्पावर अतिरिक्त भार पडू नये.

प्रकल्पाच्या आराखड्यानुसार येरवडा शास्त्रीनगर ते कोंढवा खडीमशीन चौक, सिंहगड रोड ते औंध, खडकी ते येरवडा, तसेच पु. ल. देशपांडे उद्यान ते सेव्हन लव्हज चौक आणि बाणेर-पाषाण या मार्गांवर भुयारी रस्ते तयार होणार आहेत. हे सर्व मार्ग शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

याशिवाय पुणे महापालिकेकडून स्वतंत्र दोन भुयारी मार्गांचीही तयारी सुरू आहे. पाषाण-कोथरूड आणि हिंगणे-धनकवडी या दोन मार्गांवर अतिरिक्त बोगदे उभारले जाणार आहेत.

या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती केली जाणार असून भूगर्भीय तपासणी, तांत्रिक रचना, वाहतूक नियोजन आणि आर्थिक व्यवहार्यता यांचा सखोल अभ्यास केला जाईल.

पुण्यातील पूर्व-पश्चिम रस्त्यांची क्षमता मर्यादित असल्याने उत्तर-दक्षिण वाहतूक मोठ्या प्रमाणात अडथळ्यात सापडते. जमिनीखालील मार्ग हा यावर दीर्घकालीन उपाय मानला जात आहे.

एकूणच हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पुण्याची वाहतूक व्यवस्था आधुनिक, जलद आणि सुरळीत होण्याची मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, इतक्या मोठ्या खर्चाचा आणि तांत्रिक गुंतागुंतीचा हा प्रकल्प असल्याने त्याच्या अंमलबजावणीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!