नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पदासाठी ठाकरेंना दोन मर्सिडीज द्याव्या लागतात, पण ठाकरेंकडे किती मर्सिडीज आहेत? खरी माहिती आली समोर…

मुंबई : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी नुकतेच एक वक्तव्य केले. यामुळे वाद निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागतात, असा दावा नीलम गोऱ्हेंनी केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांचा समाचार घेण्यात येत आहे.

असे असताना आता गोऱ्हे यांच्या दाव्यानंतर ठाकरे आणि मर्सिडीज कार यांची जोरदार चर्चा रंगू लागली. मर्सिडीजमधून प्रवास करणारे, कधीकधी स्वत:च मर्सिडीज चालवणारे ठाकरे अनेकांना आठवले. ठाकरेंच्या ताफ्यात नेमक्या किती मर्सिडीज आहेत, त्या कोणाच्या नावावर आहेत, असे प्रश्न सध्या अनेकांना पडले आहेत. याबाबत माहिती आता समोर आली आहे.
याबाबत माहिती अशी की, ठाकरेंच्या ताफ्यात एकूण ३ मर्सिडीज आहेत. यातील चंदेरी रंगाच्या मर्सिडीज बेंझ S320 cdil कारचा नंबर MH 43 R 9477 असा आहे. ही कार अजय नाईक यांच्या नावावर आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये या कारची नोंदणी झालेली आहे. यामुळे ही कार देखील उद्धव ठाकरे यांच्या नावावर नाही.

६ ऑक्टोबर २००७ रोजी या कारची नोंद करण्यात आलेली आहे. तसेच दुसरी मर्सिडीज बेंझ जीएल क्लासमधील आहे. पांढऱ्या रंगाची ही कार MH 11 AB 2979 क्रमांकाची आहे. तिची नोंदणी ११ सप्टेंबर २०१५ रोजी साताऱ्यात झालेली आहे. घोडके नावाच्या व्यक्तीनं या कारची नोंदणी केलेली आहे. ही देखील ठाकरे यांच्या नावावर नाही.

तसेच तिसरी मर्सिडीज बेंझ एस क्लासची नोंदणी प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडकडून करण्यात आली आहे. या कारची नोंदणी ३० जुलै २०१० रोजी करण्यात आलेली आहे. मुंबईतील ताडदेवमध्ये या कारची नोंद करण्यात आलेली आहे. अशी माहिती समोर आली आहे. यामुळे गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले, गोऱ्हे सेनेकडून ४ वेळा विधानपरिषदेवर गेल्या. म्हणजे त्यांनी ८ मर्सिडिज दिल्या असतील. त्यांनी त्यांच्या पावत्या दाखवाव्यात, अशी खुली ऑफरच त्यांनी दिली आहे. यामुळे हे प्रकरण सध्या तापले आहे. शरद पवार यांनी देखील गोऱ्हे यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगितले आहे.