मुंबईकरांनो… उद्या लोकलनं प्रवास करणार आहात? वेळापत्रक तपासूनच प्रवास करा..

मुंबई : तुम्ही रविवारी मुंबईत लोकलने प्रवास करणार असाल तर ही सूचना तुमच्यासाठी महत्वाची आहे. रेल्वेच्या देखभालीच्या कामांमुळे मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुधारित वेळापत्रकानुसार प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान, धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.३५ पर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकल गाड्या जलद मार्गावरून चालवण्यात येतील.
दरम्यान, या बदलामुळे, लोकल गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील. प्रवाशांच्या सोयीसाठी, या स्थानकांनंतर लोकल पुन्हा धीम्या मार्गावर धावतील.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. याचा परिणाम म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, बेलापूर आणि वाशी दरम्यानच्या लोकल सेवा पूर्णपणे रद्द राहतील.
प्रवाशांच्या सोयीसाठी, विशेष लोकल फेऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान चालवल्या जातील. तसेच, हार्बर मार्गावरील प्रवासी ठाणे ते वाशी आणि नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करू शकतात.
दरम्यान, बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. प्रवाशांसाठी, बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान धावणाऱ्या जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.