MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित; विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, तुकाराम मुंढेंकडे चौकशीची जबाबदारी

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री स्थगित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

चौकशी समितीत तुकाराम मुंढेंचा समावेश
एमपीएससीच्या कारभाराशी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या समितीला चौकशी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. आयोगाचे आजी-माजी अध्यक्ष तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही तपासणी केली जाणार आहे.


विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर ठेवण्याचा निर्णय घेतला. चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहता रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याचे विवेक भीमनवार यांनी सांगितले. आयोगाची स्वायत्तता, विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांचे हित यांना आपण नेहमीच प्राधान्य दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेली प्रकरणे मागे घेण्याबाबतही सरकारकडून आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या मागणीबाबत पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
तीन वर्षांत ७० हजार पदे भरण्याचे आश्वासन
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने पुढील तीन वर्षांत ७० हजार रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पोलीस भरतीसाठी एकच अभ्यासक्रम ठेवण्याबाबतही सहमती दर्शवण्यात आली आहे. या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर तोडगा काढण्याच्या दिशेने पाऊल पडल्याचे मानले जात आहे.
आता चौकशी समितीचा अहवाल काय येतो, आयोगाच्या कारभाराबाबत कोणते निष्कर्ष समोर येतात आणि सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कधी होते, याकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
