लाडक्या बहिणींच्या खात्यात ‘खटाखट’ पैसे जमा होण्यास सुरुवात; मार्च हप्त्याची रक्कम मिळताच महिलांमध्ये आनंद

राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण होते. मात्र आता सरकारकडून लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून अनेक महिलांना बँकेकडून रक्कम जमा झाल्याचे एसएमएसही मिळू लागले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र मिळेल, अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जात होती. परंतु सध्या अनेक लाभार्थींना केवळ 1500 रुपयांची रक्कम जमा झाल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच सरकारने सध्या मार्च महिन्याचा हप्ता वर्ग करण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल आणि मे महिन्यांचा लाभ अद्याप प्रलंबित असून तो नेमका कधी जमा होणार, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निधी वर्ग करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. योजनेसाठी ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर राज्यभर मोठ्या प्रमाणावर पडताळणी मोहीम राबवण्यात आली. या प्रक्रियेनंतर जवळपास 70 लाख लाभार्थी अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे.

महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारंवार मुदतवाढ आणि जनजागृती करूनही अनेक महिलांनी आवश्यक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे अशा लाभार्थींना योजनेतून वगळण्यात आले आहे.

तुमच्या खात्यात पैसे आले का? असे करा तपास
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर बहुतांश बँकांकडून लाभार्थींना एसएमएस पाठवला जातो. जर एसएमएस मिळाला नसेल तर खालील मार्गांनी खात्यातील रक्कम तपासता येऊ शकते:
बँकेच्या बॅलन्स चेक नंबरवर एसएमएस पाठवून
टोल फ्री नंबरवर मिस्ड कॉल देऊन
गुगल पे, फोन पे किंवा नेट बँकिंगद्वारे
एटीएममध्ये जाऊन मिनी स्टेटमेंट पाहून
थेट बँकेत जाऊन खात्याची माहिती घेऊन
राज्य सरकारकडून उर्वरित दोन महिन्यांचे हप्ते कधी जमा होणार, याकडे आता लाखो महिलांचे लक्ष लागले आहे.