मोदी सरकारचा मोठा निर्णय! आजपासून देशभरात नवा नियम लागू; ‘या’ वस्तूच्या निर्यातीवर बंदी…

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोन्याची खरेदी टाळण्याचे आणि पेट्रोल-डिझेलचा वापर जपून करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. अशातच आता केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम साखर उद्योग आणि शेतकऱ्यांवर होणार आहे.

केंद्र सरकारने देशांतर्गत साखरेचा पुरवठा आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी लागू केली आहे. ही बंदी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे जागतिक साखर बाजारातही मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारच्या अधिसूचनेनुसार कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध साखर यांच्या निर्यातीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे…
• युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी असलेल्या ठराविक कोट्यातील (CXL आणि TRQ) निर्यातीला बंदीतून सूट देण्यात आली आहे.
• इतर देशांच्या अन्नसुरक्षेसाठी सरकार-ते-सरकार पातळीवरील निर्यात सुरू राहणार आहे.
• ज्या साखरेच्या खेपांची निर्यात प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे, त्यांना या निर्णयातून दिलासा देण्यात आला आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आई जेवू घालेना आणि बाप भीक मागू देईना, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
राजू शेट्टी यांनी उपस्थित केलेले मुद्दे..
• गेल्या चार वर्षांपासून साखरेचा किमान विक्री दर (MSP) वाढवण्यात आलेला नाही.
• देशभरातील शेतकऱ्यांचे सुमारे १२ हजार कोटी रुपये थकीत असल्याचा दावा त्यांनी केला.
• जागतिक बाजारात चांगला दर मिळत असताना निर्यात बंदी लावणे हा चुकीचा निर्णय असल्याची टीका त्यांनी केली.
भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार देश मानला जातो. देशांतर्गत तुटवडा निर्माण होऊ नये आणि दर नियंत्रणात राहावेत यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या निर्णयामुळे जागतिक बाजारात साखरेचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्याचा फायदा थायलंड आणि ब्राझीलसारख्या देशांना होऊ शकतो.