मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाचा धिंगाणा! नशेत तर्र, अर्धनग्न अवस्थेत; मराठी इन्फ्लुएन्सरला केली शिवीगाळ…

मुंबई : अभिनेत्री राखी सावंतची जवळची मैत्रीण म्ङणून ओळखली जाणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे नुकत्याच एका घटनेमुळे चर्चेत आली आहे. मुंबईतल्या अंधेरी भागात रविवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
रविवारी रात्री राजश्रीच्या गाडीचा अपघात झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख मद्यपान करून गाडी चालवत होता आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप तिने केला आहे.
राजश्री मोरेने मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या गाडीचा झालेला अपघात, त्यानंतर झालेली धक्कादायक वादावादी, अर्धनग्न अवस्थेत दिलेल्या धमक्या आणि शिवीगाळ यामुळे सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर राजश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये राहिल अर्धनग्न अवस्थेत तिच्यावर आक्रमकपणे शिवीगाळ करताना दिसून येत आहे. यामध्ये तो तिला धमकी देतानाही दिसतोय. xxx पैसे घे. जा आणि पोलिसांना सांग.. मी जावेद शेखचा मुलगा आहे. मग काय होईल ते तुला दिसेल, अशी धमकी त्याने राजश्रीला दिली.
संबंधित व्हिडीओमध्ये तो घटनास्थळी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशीही वाद घालताना दिसतोय. तो पोलिसांना सहकार्य करण्यास नकार देतो आणि त्यांच्याशी आक्रमकपणे वागतो. याप्रकरणी राजश्रीने राहिलविरोधात एफआयआर दाखल केली असून त्याची कॉपीसुद्धा तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
राहिल दारुच्या नशेत गाडी चालवर होता आणि वडिलांच्या राजकीय पदावरून धमकी देत होता, असा आरोप तिने केला आहे. इतकंच नव्हे तर एफआयआर दाखल केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून सतत धमक्या मिळत असल्याचं तिने म्हटलंय. राजश्रीने पोस्ट केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.