महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं संकट; 13 राज्यांना इशारा, समुद्रातील हालचालींनी वाढवली चिंता

मुंबई : देशभरात मान्सूनचा जोर कायम असतानाच आता बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलांनी चिंता वाढवली आहे. भारतीय हवामान विभागाने 29 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रासह 13 राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. काही राज्यांमध्ये मुसळधार, तर ओडिशातील काही भागांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
ईशान्य उत्तर प्रदेश आणि लगतच्या परिसरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र पुढील 24 तासांत कमजोर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचा परिणाम पूर्णपणे संपणार नसल्याने उत्तर भारतातील काही भागांत पावसाचा सिलसिला सुरू राहू शकतो. दुसरीकडे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडे चक्रीवादळसदृश वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे 29 ऑगस्टच्या आसपास उत्तर-पश्चिम बंगालचा उपसागर, पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या परिसरात आणखी कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

ओडिशासाठी हवामान विभागाचा इशारा विशेष महत्त्वाचा आहे. 29 ऑगस्टला राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. त्यासोबत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे किनारी भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. विदर्भात 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर कोकण आणि गोव्यात 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत अनेक ठिकाणी व्यापक पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात.
उत्तर प्रदेशात 29 ऑगस्टला पश्चिम आणि पूर्व भागात पावसाची शक्यता असून, पूर्व उत्तर प्रदेशात 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान पुन्हा मुसळधार पावसाचा टप्पा येऊ शकतो. बिहारमध्ये 28 आणि 29 ऑगस्टला अनेक भागांत पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. झारखंडमध्येही 29 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मध्य भारतातही हवामान सक्रिय राहणार आहे. पूर्व मध्य प्रदेशात 28 ते 30 ऑगस्टदरम्यान व्यापक पावसाची शक्यता असून, 29 ऑगस्टला काही भागांत मुसळधार पाऊस होऊ शकतो. पश्चिम मध्य प्रदेशात 28 ऑगस्ट तसेच 2 आणि 3 सप्टेंबरला पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. छत्तीसगडमध्ये 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरदरम्यान पाऊस सुरू राहू शकतो.
पश्चिम बंगालपासून ईशान्य भारतापर्यंतही पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये 28-29 ऑगस्ट तसेच 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो. अरुणाचल प्रदेश, आसाम-मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीसाठी सध्या स्वतंत्र पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. 29 ऑगस्टला दिल्लीमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र, मान्सून ट्रफ दिल्लीच्या आसपास असल्याने काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता कायम आहे. बंगालच्या उपसागरातील नव्या हवामान प्रणालीमुळे पुढील काही दिवस देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.