मनसेला धक्यावर धक्के; एकापाठोपाठ एक’ या ‘नेत्यांचे भाजपसह शिंदे गटात प्रवेश

मुंबई : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठोपाठ धक्के बसत आहेत.मनसे नेते संतोष धुरी आणि हेमंत कांबळे यांनी राज ठाकरेंची साथ सोडली असून त्यांनी भाजपसह शिंदे गटात प्रवेश केला आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला.संतोष धुरी यांनी भाजपमध्ये तर हेमंत कांबळे यांनी शिंदेसेनत प्रवेश केला. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदेसेनेचा भगवा हाती घेतला.
मुंबई महानगरपालिका निवडणुक प्रचाराला जोर चढला असतानाच मनसेतून इतर अन्य पक्षात जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मनसेच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्यामुळे अंधेरीत मनसेची ताकद कमी झाली. तर शिंदेगटाची ताकद वाढली आहे.

गेल्या ४ ते ५ दिवसांपूर्वी मनसेचा अंधेरी पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला होता. यानंतर अंधेरीत मोठ्या संख्येमध्ये मनसेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्यामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे.