मायलेकीला खोलीत डांबून ठेवलं, भोंदूबाबाकडून अंगावर चटके देत अमानुष मारहाण, घटनेने उडाली खळबळ..

यवतमाळ : यवतमाळमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यवतमाळच्या कॉटन मार्केट परिसरात एका भोंदूबाबाने आपल्या घरातच ‘यातनागृह’ उभारून एका मायलेकींवर अमानुष अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

यवतमाळच्या कॉटन मार्केट वंजारी फैलात येथे राहणाऱ्या एका भोंदूबाबाच्या घरी पोलीसांनी धाड टाकली असता त्या घरात एका मायलेकींचा छळवाद मांडल्याचे पाहून पोलिसही हादरले आहेत. पोलिसांनी या भोंदूबाबाच्या तावडीतून या मायलेकींची सुटका केली असून या भोंदूबाबाला बेड्या घातल्या आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, महादेव उर्फ माऊली पालवे असे या भोंदूबाबाचे नाव असून त्याने नीतू जयस्वाल व तिची १४ वर्षीय मुलगी त्रिशा यांना आपल्या जाळ्यात ओढले होते. दृष्टदोष असल्याचे सांगून त्यांना उपचारासाठी घरी बोलावले आणि तेथून सुरू झाला एका अघोरी प्रवृत्तीचा छळ. त्यांच्यासाठी पत्र्याच्या खोलीत बंदिस्त ‘यातनागृह’ तयार करण्यात आले होते.

घरातील पडक्या जागेत त्या मायलेकींना ठेवले जात होते आणि तेथेच सर्व विधी करणे भाग पडत होते. गरम सळईने चटके देणे, शारीरिक मारहाण, आणि मानसिक छळ अशा प्रकारांनी त्या मायलेकींच्या शरीरावर जखमांचे वळ दिसले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महादेव पालवे याला अटक केली. पीडीत मायलेकींना शासकीय रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून लैंगिक अत्याचाराचीही शक्यता गृहीत धरून तपास सुरू आहे.