उरुळी कांचन येथील व्यापाऱ्याने मित्राला लावला तब्बल २३ लाखांचा ठग ; यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…!
यवत : शेतमाल खरेदी करून तो दुबईला पाठविण्याच्या बहाण्याने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका व्यापाऱ्याने तब्बल २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
धनंजय सुरेश शितोळे (रा. उरूळी कांचन ता. हवेली) असे फसवणूक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अक्षय तानाजी काळभोर (रा. केडगाव, देशमुख मळा ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धनंजय शितोळे याने दुबईमध्ये माझी खुप मोठी ओळख असुन तेथे माझा मोठा गाळा आहे.आपण एकत्रित व्यवसाय करु म्हणून फिर्यादी अक्षय काळभोर यांचा विश्वास याने संपादन केला .तुम्ही मला २० लाख रूपये द्या अशी मागणी काळभोर यांच्याकडे केली होती.
व्यवसाय करु म्हणून विश्वासाचा फायदा घेत काळभोर यांनी आरोपी शितोळे यांना रोख ९ लाख रूपये तसेच खात्यावर ८ लाख ५० हजार रूपये व ५ लाख ५० हजार रुपयांचा २९ टन कांदा असे मिळून २३ लाख रूपयांची फसवणुक केल्याची तक्रार यवत पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यानुसार धनंजय शितोळे याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहा. फौजदार गाडेकर करीत आहेत.