महाराष्ट्रात मेगा गुंतवणुकीचा धमाका! तब्बल 89,731 कोटींच्या 5 प्रकल्पांना मंजुरी; 20 हजार रोजगाराच्या संधींचे दार उघडले

मुंबई : महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर मोठा बदल घडवणारा ऐतिहासिक निर्णय समोर आला आहे. राज्यात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत तब्बल 89,731 कोटी रुपयांच्या पाच विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यात सुमारे 20 हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

या मेगा प्रकल्पांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. कोळसा गॅसिफिकेशनपासून सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक स्टील आणि कोटिंग तंत्रज्ञानापर्यंत अत्याधुनिक उद्योगांचा यात समावेश आहे.
या प्रकल्पांमध्ये अदानी एंटरप्रायझेसचा सर्वात मोठा प्रकल्प नागपूर जिल्ह्यातील लिंगा कळमेश्वर येथे उभारला जाणार आहे. तब्बल 70 हजार कोटींची गुंतवणूक करून हा प्रकल्प कोल मायनिंग आणि गॅसिफिकेशन क्षेत्रात असेल, ज्यातून सुमारे 10 हजार रोजगार निर्माण होतील.

छत्रपती संभाजीनगर येथे अक्षत ग्रीनटेक लिमिटेड कंपनी 12,500 कोटींची गुंतवणूक करून सोलर सेल आणि मॉड्युल उत्पादन प्रकल्प उभारणार असून यात 4 हजार रोजगार उपलब्ध होतील. तसेच एनएलएमके इंडिया कोटिंग कंपनी 840 कोटींची गुंतवणूक करून 153 रोजगार निर्माण करणार आहे.

नागपूरमध्येच एचएस हयुसंग इंडिया कंपनी 1740 कोटींचा प्रकल्प उभारून 400 लोकांना रोजगार देणार आहे. तर नाशिकमध्ये गॅफाइट कंपनी 4,651 कोटींची गुंतवणूक करून इलेक्ट्रिक स्टील आणि संबंधित उत्पादन क्षेत्रात 1066 रोजगार निर्माण करणार आहे.
राज्य सरकारने या निर्णयाला औद्योगिक प्रगतीचा मोठा टप्पा म्हटले असून, या गुंतवणुकीमुळे फक्त थेट रोजगारच नाही तर सहाय्यक उद्योग, लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळीमध्येही मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत.
या निर्णयामुळे महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीचा वेग वाढणार असून तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधींचे दरवाजे उघडले आहेत.