तापमानवाढीच्या दृष्टचक्राला थांबविण्यासाठी भरीव वृक्षारोपण करणे ही काळाची गरज- शिवकुमार सेल्वा; पुरंदरमध्ये देशी वृक्षांची लागवड

पुरंदर : जागतिक वनदिन व जागतिक जलदिन याचे औचित्य साधून नुकतेच जॉन्सस कंट्रोल इंडिया व भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंधर तालुक्यातील कोडीत खुर्द येथे १२५० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना जॉन्सस कंट्रोल इंडिया चे उपाध्यक्ष शिवकुमार सेल्वा यांनी आपले मत मांडले.
ते म्हणाले, सध्या सर्व जगाला तापमान वाढीच्या परिणामांला तोंड द्यावे लागत आहे. परंतु यासाठी पृथ्वीच्या संवर्धनासाठी व सरंक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे झालेले आहे. वृक्षाच्या अनेक देशी प्रजातीमुळे सभोवतालचे जैवविविधता व जलसंवर्धन यासारख्या नैसर्गिक प्रक्रियांचे पुर्नजीवन तर होईलच पण त्याच बरोबर पशुपक्षी, किटक, जनावरे, जंगली श्वापदे व मानव याच्या करिता हि अनेक गोष्टींचा लाभ प्राप्त होणार आहे.
केवळ वृक्षारोपण करून चालणार नसून लावलेल्या सर्व वृक्षांचे संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. जगण्यासाठी जसे पाणी आवश्यक आहे तसेच ऑक्सिजनची हि तितकीच आवश्यकता आहे. हरितवायूच्या उत्सर्जनामुळे जगातील सर्व देशांमध्ये सध्या तापमानामध्ये थोड्या फार फरकाने वाढ झाल्याची दिसून येत आहे.
अशा प्रसंगी झाडांच्या माध्यमातून कार्बनडायऑक्साईड सारखे वायूंचे मोठ्या प्रमाणात शोषण होणार आहे. एक एकर मधील झाडे हि वर्षाला एक कार २६००० कि.मी. धावताना जेवढा कार्बनडायऑक्साईड सोडते तेवढा ते शोषून घेतात. यावरूनच वृक्ष लागवड किती महत्त्वाची आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे असे हि अधोरेखित केले. शिवाकुमार सेल्वा यांचे भाषण श्रीमती वर्तिका जिंदाल यांनी मराठीत भाषांतर करून सर्वांना सांगितले.
याप्रसंगी भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक प्रकाश जगताप यांनी वृक्ष लागवडीच्या शास्त्रीय पद्धतीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली व प्रत्यक्ष वृक्षलागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यांच बरोबर झाडांमुळे होणारे अनेक फायद्याची माहिती देण्यात आली.
यामध्ये हवेची गुणवत्ता सुधारणे, तापमानांमधील होणारी घट, जल प्रदुषणांमध्ये कमतरता करणे, पाण्याचे संवर्धन होणे, अपारंपरिक ऊर्जा निर्मिती, वन्य प्राण्यांना सावली, पाण्याची सोय, जमिनीची धूप थांबविणे आदी फायद्याची सविस्तर माहिती प्रकाश जगताप यांनी दिली.
या कार्यक्रमास जॉन्सस कंट्रोल इंडिया प्रा.लि. च्या वतीने शिवकुमार सेल्वा गणपथी, मनिष जेठवानी, प्रसन्न बारी, वर्तिका जिंदाल, सौम्यला नाझली, संतोष चिखले, नितीन राऊत, मोहन शेलार तर भारतीय बहुउद्देशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्थेच्या वतीने प्रकाश जगताप, दत्तात्रय लोंढे, अक्षय राऊत, जयेश खन्ना, शेखर मरकड तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.