मोटारसायकल न दिल्याने विवाहितेचा छळ, लोणीकंद येथील विवाहितेने गळफास घेऊन संपवले जीवन…

लोणीकंद : हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून एका २१ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोणीकंद परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी मृत महिलेच्या पतीविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंजनीकुमारी शिवाजी मौर्या (वय. २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील रहिवासी होती. तिचा विवाह एप्रिल २०१४ मध्ये शिवाजी रमेशचंद्र मौर्या याच्याशी झाला होता.

मिळालेल्या माहिती नुसार, मृत अंजनीकुमारीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नावेळी त्यांनी हुंड्यात मोठी रक्कम, दागिने आणि इतर वस्तू दिल्या होत्या. तरीही पती शिवाजी मौर्या ‘अपाचे मोटारसायकल दिली नाही’ या कारणावरून अंजनीकुमारीला सतत शिवीगाळ आणि मारहाण करत होता.

तसेच ११ जुलै २०२५ रोजी शिवाजीने अंजनीला उत्तर प्रदेशहून पुण्यात आणले आणि त्यानंतर तिचा त्रास आणखी वाढला. १६ सप्टेंबर रोजी अंजनीने वडिलांना फोन करून ‘हा छळ सहन होत नाही’ असे सांगितले. त्यानंतर तिच्या पतीने सासऱ्याला फोन करून ‘मी अंजनीला मारून टाकीन’ अशी धमकी दिली.
दरम्यान, याच त्रासाला कंटाळून अंजनीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ससून रुणालयात पाठवण्यात आला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला आहे.
