Maratha Reservation :अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्यात; मनोज जरांगे पाटील संध्याकाळी मोठी घोषणा करणार?

Maratha Reservation जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १३ वा दिवस आहे. आजही त्यांचे उपोषण (Maratha Reservation) सुरू आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री जालन्यात येत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
त्यानुसार, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जाणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता हे नेते जालन्यात पोहोचणार असून जरांगे पाटील यांचं उपोषण सोडणार आहेत.
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकात पाटील आज सायंकाळी ५ वाजता जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी गावात जाऊन जरांगे पाटील यांच्याशी उपोषण मागे घेण्यासाठी चर्चा करणार आहेत.
शिंदे, पवार आणि पाटील हे भेटीसाठी येणार असल्याबाबत जरांगे पाटील यांना विचारले असता त्यांनी आपल्याला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, मला अधिकृत कोणाचाही फोन आला नाही. मीडियाच्या माध्यमातून मला सुद्धा समजले. पण त्यांना समाजाशी संवाद साधण्यासाठी येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करुन चंद्रकांत पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. सरकारकडून मराठा आरक्षणासाठी उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे या समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार असून त्यांची भूमिका समजून घेणार आहेत.