IMD चा मोठा इशारा! महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर; ‘या’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट


मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 28 आणि 29 जुलैदरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे काही जिल्ह्यांसाठी यलो, तर काहींसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत विदर्भात पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, नव्याने तयार झालेल्या हवामान प्रणालीमुळे पुन्हा पावसाचा वेग वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. विशेषतः नागपूर विभागातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागपूर हवामान केंद्राने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला असून काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी तसेच सखल भागात राहणाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.

मंगळवारपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासह कोकण किनारपट्टी, भंडारा, गडचिरोली, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, 1 जून ते 27 जुलै या कालावधीत विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये सरासरी 26 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. आगामी पावसामुळे ही तूट काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता असली, तरी संपूर्ण पावसाची कमतरता भरून निघेलच असे नाही, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांचा पाऊस शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

याचदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या दमदार मान्सून वाऱ्यांमुळे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून खेडमधील जगबुडी, चिपळूणमधील वाशिष्टी आणि रत्नागिरीतील काजळी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुढील 48 तासांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!