डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट! मुख्य आरोपी अंदुरेला जामीन, जन्मठेपेला स्थगिती


मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. तसेच त्याला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती देण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. दाभोलकर हत्या प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सचिन अंदुरेच्या जामीन अर्जावर निर्णय दिला. या प्रकरणातील सहआरोपी शरद कळसकर यालाही एप्रिल महिन्यात जामीन मंजूर झाला होता.

सचिन अंदुरेने वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्यामार्फत विशेष यूएपीए न्यायालयाच्या 10 मे 2024 रोजीच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अंतिम निकाल होईपर्यंत जामीन मंजूर करावा आणि जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्याने केली होती.

जामीन अर्जावर युक्तिवाद करताना सीबीआयने कोणतीही ओळख परेड घेतली नसल्याचा मुद्दा अंदुरेच्या वकिलांनी मांडला. तसेच या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबांमध्ये विसंगती असल्याचा दावा त्यांनी केला.

न्यायालयात काही साक्षीदारांनी अंदुरेची ओळख पटवल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याच्या वकिलांनी या साक्षीदारांच्या जबाबांमधील कथित विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. काही साक्षीदारांनी अंदुरेनेच दाभोलकरांवर गोळीबार केल्याचा दावा केला, तर काहींनी आपण घटनास्थळी प्रत्यक्ष पाहिले नसल्याचे सांगितल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने सचिन अंदुरेला जामीन मंजूर करत त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!