केतन अग्रवालच्या मृत्यूच्या ९३ दिवसांनी मोठी अपडेट; पुणे पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, सिया गोयलचा ‘गेम ओव्हर’

पुणे : पुण्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाला सुरुवातीला अपघाताचे स्वरूप असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तपास पुढे गेल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली असून, या प्रकरणात हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.
आता या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांकडून न्यायालयात २ हजारांहून अधिक पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. त्यात तपासादरम्यान हाती आलेले सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल, घटनास्थळाचा पंचनामा तसेच डिजिटल पुराव्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

२ हजारांहून अधिक पानांचे दोषारोपपत्र
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांकडून १९ सप्टेंबर रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची तयारी करण्यात आली आहे. या दोषारोपपत्रात आरोपींविरोधात तपासात जमा झालेले विविध पुरावे सादर करण्यात येणार आहेत.


पोलिसांच्या तपासानुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यातील कथित संभाषणे, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर डिजिटल पुरावे तपासाचा महत्त्वाचा भाग आहेत.
सिया-केतनच्या चॅटिंगसह डिजिटल पुरावे हाती
तपासादरम्यान सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांच्यातील चॅटिंगही पोलिसांच्या हाती लागल्याचे वृत्त आहे. याशिवाय पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर घटनाक्रमाची पुनर्रचना (सीन रिक्रिएशन) करून घटनास्थळाशी संबंधित पुरावेही तपासात समाविष्ट केले आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिया आणि चेतन यांनी केतनला लोहगडावरून ढकलून त्याच्या मृत्यूला अपघाताचे स्वरूप देण्याचा कथित कट रचला होता. या प्रकरणात आरोपींनी गुन्ह्यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने हत्येच्या विविध मार्गांचा शोध घेतल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
मोबाईलमधून डिलीट केलेल्या डेटाच्या तपासादरम्यान काही वेब लिंक्स मिळाल्याचेही वृत्त आहे. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास पुढे नेला असून, त्याचा समावेश दोषारोपपत्रात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.