‘संबंध ठेव नाहीतर नवरा-लेकरांना मारून टाकू’; महिलेच्या गंभीर आरोपांनी विलास घुले हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

बीड : केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात एका महिलेने पुढे येत विलास घुले आणि त्याचा मित्र उमेश माने यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ब्लॅकमेलिंग, धमक्या आणि कुटुंबाला संपवण्याच्या भीतीमुळेच घटनांची मालिका उभी राहिल्याचा दावा तिने केला आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, उमेश माने याने तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीचा आधार घेत तिचा वारंवार छळ करण्यात आला. त्रास असह्य झाल्यानंतर तिने कुटुंबीयांना सर्व माहिती दिली. कुटुंबीय पोलिसांकडे जाण्याच्या तयारीत असताना काही जणांनी मध्यस्थी करत तक्रार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिल्याचा आरोपही तिने केला.
यानंतर कुटुंबाने शेतातील घर सोडून गावात राहण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतरही त्रास थांबला नसल्याचा दावा महिलेने केला आहे. विलास घुले आणि उमेश माने वारंवार घराजवळ येत होते. “पूर्वीसारखे संबंध ठेव, अन्यथा तुझ्या नवऱ्याला आणि लेकरांना जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी दिल्याचाही आरोप तिने केला.

२० जूनच्या रात्री पुन्हा वाद निर्माण झाला. घरासमोर येऊन शिवीगाळ व धमक्या दिल्यानंतर परिस्थिती चिघळली. त्यानंतर महिलेचे वडील, पती आणि काही नातेवाईक चर्चा करून प्रश्न मिटवण्यासाठी गेले. मात्र तेथे दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला आणि त्याचे रूप हाणामारीत बदलले. महिलेच्या दाव्यानुसार, समोरच्या गटाकडून काचेच्या बाटल्या व इतर वस्तूंनी हल्ला करण्यात आला. या झटापटीदरम्यान झालेल्या मारहाणीत विलास घुले यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत तक्रार देण्यासाठी केज आणि बीड पोलिसांकडे गेलो होतो, मात्र आमची बाजू अद्याप नोंदवून घेतलेली नाही, असा आरोप महिलेने केला आहे. दुसरीकडे, विलास घुले यांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात तीव्र आंदोलन झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे. नव्याने समोर आलेल्या आरोपांमुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.