पुण्यात बाप्पाच्या आगमनासाठी वाहतुकीत मोठे बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन, कसा असेल वाहतुकीचा मार्ग?

पुणे : गणेशोत्सवानिमित्त बाप्पाची मूर्ती वाजतगाजत घरी आणण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन आज (रविवार) आणि उद्या (सोमवार) पुण्यातील छत्रपती शिवाजी रस्ता, सारसबाग आणि मुंढव्यातील केशवनगर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी
छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीरामभय्या चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांना संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक, मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकामार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने, खंडुजीबाबा चौक आणि टिळक रस्तामार्गे जाता येईल. तसेच झाशीची राणी पुतळा चौक, खुडे चौकामार्गे कुंभारवेसकडे जाणारी वाहने छत्रपती शिवाजी पुलावरून डावीकडे वळून मार्गस्थ होतील.


नीलायम चित्रपटगृहाजवळ पार्किंगची व्यवस्था
नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) सारसबाग परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ केंद्रापर्यंत वाहतूक सुरू राहणार आहे. मात्र, या रस्त्यावर पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.
भाविकांना मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौकाच्या डाव्या बाजूस किंवा नीलायम चित्रपटगृहाजवळ वाहने पार्क करता येतील.
मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल
गणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी पुण्याच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
कसबा पेठेतील फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरुज, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), मोती चौक तसेच मंगला चित्रपटगृहासमोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंढवा-केशवनगरमध्येही वाहतुकीत बदल
मुंढव्यातील केशवनगर परिसरात मूर्तीखरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शिवाजी महाराज चौकातून मांजरीकडे जाणारी वाहने गायरान वस्ती रस्ता, विहान सोसायटी आणि मांजरी रस्त्याने मार्गस्थ होतील.
खराडी पुलाकडून येणारी वाहने रेणुकामाता मंदिर, विहान सोसायटी रस्ता आणि शिवाजी महाराज चौकातून पुढे जातील.
मुंढवा चौक, शिवाजी महाराज चौक ते कल्याणी बंगला रस्ता, शिवाजी महाराज चौक ते झेड कॉर्नर तसेच केशवनगर परिसरात जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
पीएमपी बसच्या मार्गातही बदल
शिवाजीनगर बसस्थानकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना आणि टिळक रस्तामार्गे स्वारगेटकडे जातील.
महापालिका भवन परिसरातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.
वाहनतळाची ठिकाणे
कामगार पुतळा ते छत्रपती शिवाजी पुतळा
वीर संताजी घोरपडे पथ ते गाडगीळ पुतळा चौक
टिळक पूल ते भिडे पूल, नदीपात्रातील रस्ता
मंडईतील वाहनतळ
छत्रपती शिवाजी रस्त्यावरील शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक (फक्त डावी बाजू)