महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ! जयंत पाटील होणार नवे अर्थमंत्री? शिंदेंच्या बंगल्यावर नेमकं काय घडलं?


मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील राज्याचे नवे अर्थमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या विविध नेत्यांच्या भेटींमुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

गेल्या दहा दिवसांत जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांची भेट, त्यानंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा, तसेच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या भेटी यामुळे राज्यातील सत्तासमीकरण बदलण्याच्या शक्यतांना उधाण आले आहे. यानंतर जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, जयंत पाटील यांच्याकडे अर्थखाते सोपविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, त्यानंतर या निर्णयातील अडथळे दूर झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत सरकार किंवा संबंधित पक्षांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

या राजकीय हालचालींमुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटांमध्ये पुन्हा जवळीक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही महत्त्वाच्या विधेयकांवर समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, या सर्व भेटीगाठींवर संबंधित नेत्यांनी वेगवेगळी स्पष्टीकरणे दिली असली, तरी राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे जयंत पाटील यांच्याकडे अर्थखाते जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा कायम आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!