मुंबई उच्च न्यायालयाचा शिंदेंच्या शिवसेनेला मोठा दणका; 8 आठवड्यांचा दिला वेळ, नेमकं प्रकरण काय?


ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. महापालिकेच्या विविध समित्यांच्या निवडणुका आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीला होत असलेल्या विलंबाप्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आगामी आठ आठवड्यांच्या आत पाच प्रमुख पालिका समित्यांच्या निवडणुका आणि स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन अनेक महिने उलटले आहेत. मात्र, महापालिकेच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्थायी समितीसह परिवहन समिती, शिक्षण समिती अशा पाच प्रमुख समित्यांचे सभापती आणि सदस्य निवडण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नव्हती. याशिवाय, महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची निवडही रखडली होती.

निवडणुका रखडल्याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका

महापालिकेतील समित्यांच्या निवडणुका आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीला होत असलेल्या विलंबाविरोधात वकील सागर कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेला आठ आठवड्यांच्या आत सर्व संबंधित निवडणुका आणि निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठाणे महापालिकेच्या राजकारणात हालचालींना वेग

सध्या ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असून भाजपचा पाठिंबा आहे. मात्र, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसह विविध समित्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबामागे राजकीय कारणे असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ठाणे महापालिकेतील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

न्यायालयाच्या निर्देशांमुळे आता स्थायी समितीसह पाच प्रमुख समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया निर्धारित मुदतीत पूर्ण करावी लागणार आहे. तसेच, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा रखडलेला प्रश्नही मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.

या निवडणुका आणि नियुक्त्यांमुळे ठाणे महापालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये काय बदल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!