दुष्काळी दौऱ्यात सुनेत्रा पवारांची शेतकऱ्यांसोबत भाऊबीज; झुणका-भाकरीचा आस्वाद घेत ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

बारामती : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. भाऊबीजेच्या दिवशी त्यांनी मुर्टी येथील सोनकरवस्तीला भेट देत शेतकरी कुटुंबीयांसोबत दिवाळीचा फराळ आणि झुणका-भाकरीचा आस्वाद घेत सण साजरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पिण्याचे पाणी आणि चाऱ्याच्या प्रश्नावर चर्चा
या भेटीदरम्यान पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता याबाबत त्यांनी माहिती घेतली. सोनकरवस्तीवर पिण्याच्या पाण्यासाठी दिवसातून तीन वेळा टँकर सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्यात आले असून, आगामी काळात जनावरांना चारा कमी पडू नये यासाठी शेतकऱ्यांनी मोफत उपलब्ध करून दिलेल्या शासकीय बियाण्यांचा वापर करून जास्तीत जास्त क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.

शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीचा घेतला आढावा

दिवाळीनिमित्त जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची अग्रीम मदत शेतकऱ्यांना मिळाली का, याचीही त्यांनी विचारपूस केली. यावेळी शेतकऱ्यांनी अग्रीम मदतीसोबतच कर्जमाफी आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मिळाल्याचे सांगितले. तसेच सुपे सात गाव पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करून परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जोगवाडी, अंबी येथेही केली पाहणी
सोनकरवस्तीवरील भेटीनंतर सुनेत्रा पवार यांनी जोगवाडी येथे शिवाराची पाहणी करत ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर अंबी येथे शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन स्थानिक समस्या जाणून घेतल्या. यावेळी अंबी फाट्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या मागणीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, ग्रामीण भागातील युवा स्केटिंगपटू शिवम नलावडे याने इंडोनेशिया आणि देहराडून येथील स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल सुनेत्रा पवार यांनी त्याचे कौतुक करून गौरव केला. अजितदादांनी बारामतीच्या विकासासाठी पाहिलेली स्वप्ने आपण सर्वजण मिळून पूर्ण करू, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
