पुण्यात मोठी फसवणूक! ‘पेट्रोल पंपात भागीदारी देतो’ म्हणाले, घर गहाण ठेवून अडीच कोटी दिले अन् पुढे भलतंच घडलं


पुणे : पेट्रोल पंपाच्या व्यवसायात ५० टक्के भागीदारी आणि भरघोस परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवत एका ६९ वर्षीय ज्येष्ठ व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ४७ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

या गुंतवणुकीसाठी व्यावसायिकाने स्वतःचे घर गहाण ठेवलं, तर घरातील सोन्याचे दागिनेही मोडले. सुरुवातीला काही महिने परतावा देऊन विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. पुण्यातील हडपसर परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी दोन कथित भागीदारांविरोधात काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घर गहाण ठेवलं, सोन्याचे दागिनेही मोडले

मोहन दगडू मोरे (वय ६९, रा. श्रीराम चौक, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आनंद मदनलाल लाहोटी (रा. रुणवाल सेहगल सोसायटी, हांडेवाडी रोड) आणि कालिदास विजय मगर (रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

नेमकी कशी झाली फसवणूक?

आरोपी आनंद लाहोटी आणि कालिदास मगर यांनी सय्यदनगर (हडपसर) आणि वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथील ‘मगर फ्यूल स्टेशन’ या पेट्रोल पंपांचे आपण भागीदार असल्याचे मोरे यांना सांगितले. पेट्रोल पंपाच्या व्यवसायात ५० टक्के शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष त्यांनी दाखवले. त्यामुळे मोरे यांचा आरोपींवर विश्वास बसला.

या विश्वासापोटी मोरे यांनी स्वतःचे घर गहाण ठेवून पैसे उभे केले. तसेच घरातील सोन्याचे दागिने मोडून मिळालेली रक्कमही गुंतवली. अशा प्रकारे त्यांनी टप्प्याटप्प्याने तब्बल २ कोटी ४७ लाख १५ हजार रुपये आरोपींच्या आणि पेट्रोल पंपाच्या खात्यात जमा केले.

सुरुवातीला परतावा दिला, नंतर पैसे देण्यास टाळाटाळ

मोरे यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आरोपींनी सुरुवातीच्या काही महिन्यांत नफ्याच्या स्वरूपात ठराविक रक्कम परतावा म्हणून दिली. मात्र, मोठी रक्कम मिळाल्यानंतर त्यांनी मूळ गुंतवणूक आणि लाभांश परत देण्यास टाळाटाळ सुरू केली. अखेर गुंतवलेले पैसे हडप केल्याचा आरोप आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोरे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून काळेपडळ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!