एसटी प्रवाशांना मोठा झटका! १०% वाढीव भाडे ‘या’ तारखेपर्यंत कायम; दिलासा पुन्हा लांबला

मुंबई : राज्य परिवहन प्रवाशांना तातडीचा दिलासा मिळालेला नाही. उन्हाळी हंगामासाठी लागू करण्यात आलेली १० टक्के तात्पुरती भाडेवाढ १५ जुलैनंतर संपुष्टात येणार होती. मात्र, डिझेलच्या वाढत्या किमती आणि महामंडळावरील आर्थिक ताण लक्षात घेऊन ही वाढीव भाडेवाढ आणखी १५ दिवस, म्हणजेच ३१ जुलैपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई येथे राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक बुधवारी होणार होती. मात्र, ती रद्द झाल्याने कायमस्वरूपी भाडेवाढीच्या प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नाही. आता ही बैठक शुक्रवारी होणार असून, त्यामध्ये एसटीच्या नव्या भाडेवाढीच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सध्याची १० टक्के भाडेवाढ कायम राहणार आहे.
राज्यात १५ एप्रिलपासून उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही तात्पुरती भाडेवाढ लागू करण्यात आली होती. आधी तिची मुदत १५ जूनपर्यंत होती, नंतर ती १५ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आणि आता पुन्हा ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाने १३.५ टक्के कायमस्वरूपी भाडेवाढीचा प्रस्तावही मांडला आहे. सध्या सुरू असलेल्या १० टक्के वाढीव भाड्यावर प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत असताना, आणखी दरवाढ झाल्यास सामान्य नागरिकांच्या प्रवासखर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

तिकीट दर एक रुपयांच्या पटीत असल्याने सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकांमध्ये वारंवार वाद होत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे तिकीट दर पाच रुपयांच्या पटीत निश्चित करावेत, अशी मागणी एसटी कामगार संघटनांनी केली आहे.
महामंडळाच्या माहितीनुसार, राज्यातील ३१ विभागांपैकी २१ विभाग सध्या तोट्यात असून वाढत्या इंधन खर्चामुळे डिझेल बचतीसाठी राज्यभर विशेष मोहीम राबवली जात आहे. प्रत्येक डेपोला इंधन बचतीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, सध्या दररोज सुमारे १०.८७ लाख लिटर डिझेलचा वापर होत आहे.