सावधान महाराष्ट्र! ‘या’ दिवसापासून अतिमुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा हाय अलर्ट

मुंबई : राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता भारतीय हवामान विभागाने २० जुलैनंतर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १७ जुलै रोजी उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागांत ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
वादळी वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडणे, डोंगराळ भागांत भूस्खलन आणि सखल भागांत पाणी साचण्याचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. किनारपट्टी भागातील खराब हवामान लक्षात घेता मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात २० जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार
राज्यात २० जुलैपासून पावसाची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता असून, मराठवाडा, कोकण आणि विदर्भ या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नांदेड, बीड, नाशिक, पुणे, मुंबई, पालघर, ठाणे यांसह एकूण १३ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या इशाऱ्यांवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.