मिशन सुधार मोहिमेत मोठी कारवाई; जिल्ह्यात २० हजार रेशन कार्डधारकांचा धान्यलाभ बंद होणार


छत्रपती संभाजीनगर: शासनाच्या ‘मिशन सुधार’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात तब्बल 1 लाख 7 हजार 382 रेशन कार्डांची तपासणी करण्यात येत आहे. विविध निकषांनुसार या तपासणीत सुमारे 20 हजार कार्डधारक अपात्र ठरण्याची शक्यता असून, त्यांचा रेशन धान्याचा लाभ कायमस्वरूपी बंद होण्याचे संकेत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. यापूर्वी पहिल्या टप्प्यात 18 हजार कार्डधारकांचा धान्यपुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे.

शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार रेशन कार्डधारकांची तपासणी केली जात आहे. यामध्ये दुबार कार्डधारक, निकषांमध्ये न बसणारे आणि निष्क्रिय लाभार्थी यांचा शोध घेण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील तब्बल 18 हजार कार्डधारकांचा धान्याचा लाभ बंद करण्यात आला होता. आता ‘मिशन सुधार’च्या दुसऱ्या टप्प्यात 1 लाख 7 हजार 382 लाभार्थ्यांची नोंद तपासण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

या मोहिमेत आतापर्यंत सर्वाधिक 45 हजार 142 ‘सायलेंट बेनिफिशियरीज’ आढळले आहेत. याशिवाय 6 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न किंवा उलाढाल असलेले, आयकर भरणारे, पॅन कार्ड किंवा आरटीजीएस सुविधा असतानाही स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या कार्डधारकांच्या नोंदींचीही तपासणी केली जात आहे. तपासणीत अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा धान्याचा लाभ बंद केला जात आहे.

दुसऱ्या टप्प्यात तपासणीअंती सुमारे 20 हजार कार्डधारक अपात्र ठरू शकतात, असे संकेत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत.

6 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या 40 हजारांहून अधिक नोंदी

जिल्ह्यात ‘मिशन सुधार’अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 6 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या 40 हजार 555 नोंदींची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील 15 हजार 138 रेशन कार्डधारकांचा समावेश आहे. तसेच 4 हजार 808 कार्डधारकांच्या नोंदी आधारस्थितीशी संबंधित आहेत.

100 वर्षांपेक्षा अधिक वयाचे 238 सदस्य

जिल्ह्यातील रेशन कार्डधारक सदस्यांमध्ये 100 वर्षांपेक्षा अधिक वयाचे 238 सदस्य आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक 60 कार्डधारक सदस्य छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील आहेत. त्यानंतर गंगापूरमध्ये 49 आणि वैजापूरमध्ये 26 कार्डधारक सदस्य 100 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत.

45 हजारांहून अधिक ‘सायलेंट लाभार्थी’

जिल्ह्यात स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या कार्डधारकांपैकी तब्बल 45 हजार 142 कार्डधारकांनी अनेक महिन्यांपासून धान्य घेतलेले नसल्याचे तपासणीत समोर आले आहे. या ‘सायलेंट लाभार्थीं’मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील 14 हजार 276 कार्डधारक आहेत.

याशिवाय कन्नडमध्ये 5 हजार 45, पैठणमध्ये 7 हजार 414 आणि वैजापूरमध्ये 4 हजार 573 सायलेंट लाभार्थी आढळले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!